पनवेल पंचायत समितीकडून सन्मान
मोहोपाडा ः प्रतिनिधी
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील शेती संशोधक मिनेश मोहन गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने धान्य टरफलावर संशोधन केले आहे. दरम्यान, शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पनवेल पंचायत समितीच्या वतीने सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते गाडगीळ यांचा सन्मान करण्यात आला.
देशाच्या इंधन समस्येवर मात करण्यासाठी यशस्वी ठरत असलेल्या बायोडिझेल निर्मितीत कच्चा माल म्हणून महत्त्वाची असणारी अल्कोहोल अॅसिड्स आणि फॅटी अॅसिड्स ही मूलद्रव्ये देशात उपलब्ध असलेल्या विविध धान्यांच्या टरफलापासून तयार करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन गाडगीळ यांनी केले आहे.
घरातील टाकाऊ भाज्या, निर्माल्य व अन्नघटक यांचे खत तयार करण्यासाठी गाडगीळ यांनी सेंद्रिय प्लॅट ग्रोथ प्रमोटर व कंपोष्ट इनव्हॅन्सर हे स्वयंशोधित उत्पादन सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी केले आहे. मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अल्कोहोल, अॅसिड्स अॅण्ड फॅटी अॅसिड्स फ्रॉम सीड्स हस्क या त्यांच्या संशोधनास भारत सरकारचे पेटंटदेखील प्राप्त झाले आहे.
शासनाने दखल घेतल्याने संपूर्ण राज्यभर मला या संशोधनाचा प्रसार करता येणार असल्याची प्रतिक्रिया गाडगीळ यांनी दिली, तसेच हा पुरस्कार शेतकर्यांना समर्पित केला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
दरम्यान, शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पनवेल पंचायत समितीच्या वतीने सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते मिनेश गाडगीळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी गटविकास अधिकारी लता मोहिते, विस्तार अधिकारी घरत, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, रत्नप्रभा घरत, तनुजा टेंबे, रेखा म्हात्रे, तालुका कृषी अधिकारी चौधरी आदी उपस्थित होते.