Breaking News

उरणमध्ये पिकवला कलिंगडाचा मळा

चिरनेरच्या शेतकर्‍यांचा यशस्वी प्रयोग

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यात भातशेतीबरोबर काही भागात वालांची शेती तसेच भाजीपाल्याचे उत्पादन मागील कित्येक वर्षांपासून घेतले जात आहे. त्यातीलच चिरनेर येथील शेतकरी गजानन चांगु केणी हे कित्येक वर्षे भाजीपाल्याचे पीक नियमित घेत होते, मात्र या शेतकर्‍यांनी भाजीपल्याबरोबर आपल्या शेतातील अवघ्या 25 गुंठे जागेत बेबी या जातीच्या कलिंगडाची लागवड केली आहे. गजानन केणी यांना कलिंगडाच्या लागवडीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून 25 गुंठाच्या जागेत दीड टनापेक्षा अधिक कलिंगडाचे उत्पादन मिळविले आहे.

त्यासाठी या शेतकर्‍याला बियाणे, खत व मजुरीसह 14 हजार रुपये खर्च आला आहे. त्याचप्रमाणे त्याने स्वतःही मेहेनत करून दीड टनाहून अधिक कलिंगड उत्पादन झाल्याने त्यांना या कलिंगड शेतीतून 45 हजार रुपये उत्पन्न मिळाले असून, 14 हजार खर्च वगळता तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या कलिंगडाच्या लागवडीतून 31 हजार रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. त्याच प्रमाणे वांगी आणि मिरचीच्या उत्पन्नातूनही समाधान कारक  नफा मिळत आहे.

या परिसरात चिरनेर आणि कळंबूसरे बाजुनी डोंगराळ भाग असल्याने डोंगराच्या पाण्याच्या निचर्‍यामुळे शेतीचा मातीला अधिक प्रमाणात ओलावा राहतो. त्यामुळे  कलिंगडाच्या पिकाला ही जमीन पोषक ठरत असल्याने कलिंगडाचे उत्पादन चांगल्याप्रकारे होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण चिरनेरचे शेतकरी गजानन केणी यांनी संपूर्ण उरण तालुक्याला दाखवून दिले आहे. सदर कलिंगड गोड आणि चवदार असल्याने पनवेल व उरण येथील किरकोळ बाजारपेठेत हा कलिंगड विक्रीसाठी पाठविला जात आहे, तसेच स्वतः ही कलिंगडाची विक्री चिरनेर च्या नाक्यावर केली जात आहे.

उरण तालुक्यात कित्येक वर्षांपासून पारंपरिक पद्घतीने दुधी, कारली, पडवळ, शिराळी, घोसाळी, काकडी, वांगी, टोमॅटो आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे, परंतु कलिंगडाचे पिक आजपर्यंत कोणीही घेण्याचा प्रयत्न केला नाही. उरण तालुक्यातील चिरनेर येथील शेतकरी गजानन केणी यांनी सर्व प्रथम कलिंगडाची लागवड करून त्याची योग्यतेने जोपासना करून कलिंगडाचे सुयोग्य, असे उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहेत.

त्यामुळे भाताचे कोठार असलेल्या उरण तालुक्यातील तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता कलिंगड, ऊस अशा उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन उरणचे सहाय्यक कृषी अधिकारी उमेश गाताडी यांनी केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply