मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांत झालेली वाढ ही फक्त नियमांचे पालन न केल्याने झाली आहे असे लादून राज्य सरकार राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करणार असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने लॉकडाऊनला विरोध दर्शवत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. लॉकडाउन करणे राज्याला आता पेलवणारे नाही. ठाकरे सरकार फसवाफसवीचे धंदे करत आहे, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची चिन्हं दिसत आहे. पुण्यात तर आज मिनी लॉकडाऊनची घोषणा देखील झाली आहे. या वरून नारायण राणे पत्रकारपरिषदेत म्हणाले, अन्य राज्यांमध्ये करोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली, मग महाराष्ट्रात का वाढते आहे? या मुख्यमंत्र्यांनी या सरकारने नक्की काय केले? आता सगळीकडून उठाव होऊ लागल्याने घाबरले आहेत. यांना लॉकडाऊनची धमकी देण्याचा अधिकार आहे का? नागरिकांना शिस्त पाळा नाहीतर आम्ही लॉकडाऊन सुरू करू, असे सांगत आहेत. हे राज्य काय तुम्ही विकत घेतले आहे का? नागरिकांशी बोलताना मान, सन्मान देऊन मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवे. कोरोना संसर्ग वाढला म्हणून लॉकडाऊन करणे हे राज्याला आता पेलवणारे नाही. आज बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावी गेले तरी हीच परिस्थिती आहे. सर्व उद्योग-धंदे कोलमडले आहेत, याची चिंता राज्य सरकारला आहे की नाही? हे सरकार फसवाफसवीचे धंदे करत आहे. आता सरकार नरमले आहे, निर्बंधाचा गोष्टी करत आहे, तसेच आता दिवसा नाही रात्री लॉकडाऊन म्हणत आहे. माणसे दिवसभर काम करून संध्याकाळी घरी जातात, मग खरेदीला जातील अन्य कुठे जातील, आता काय घरी बसायचे का? लोकांनी खायचे काय? राहायचे कसे? मुलांना शिकवायचे कसे? याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री व अन्य मंत्री काहीही बोलत नाही, असे या वेळी राणेंनी बोलून दाखवले. लॉकडाऊननंतर उदरनिर्वाहचे साधन संपल्यानंतर जनतेने काय करावे? दोन वेळेचे जेवणाचे पॅकेट मुख्यमंत्री घरी पाठवणार आहेत का? कोरोनामुळे या राज्य सरकारचे नाक कापले ते सोडून द्या, पण महाराष्ट्र आर्थिकबाबतीत मागे गेला आहे. अधोगतीकडे गेला आहे. याला कारण हे मुख्यमंत्री आहे, हे राज्य सरकार आहे. असा आरोपदेखील राणेंनी या वेळी केला.