मुंबई : प्रतिनिधी
जाहिरात या क्षेत्रात विविध संस्था काम करीत असून स्पर्धाही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. या स्पर्धेत टिकाव धरून नागपूरच्या मीडियाफोरम प्रा. लि. जाहिरात संस्थेला मुंबई येथील सोलटच मीडिया प्रा. लि व मुख्य प्रवाहातील वृत्तपत्राद्वारे सन 2019च्या उदयोन्मुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यम प्रमुख व्हिडीओकॉन आर. एम. पाटील, सोलटच मीडिया प्रा. लि.चे संस्थापक सि देवीदास, अनिश चांदेरे, संपादक जनादेश राजेंद्र चौधरी हे उपस्थित होते. दरवर्षी अशा पुरस्काराचे आयोजन सोलटच मीडिया प्रा. लि. व मुख्य प्रवाहातील वृत्तपत्राद्वारे संयुक्त विद्यमाने मुंबई येथे करण्यात येते. सन 2019 च्या विविध पुरस्कारांसाठी जाहिरात क्षेत्रातील संस्था तसेच वृत्तपत्र संपादक, प्रतिनिधींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वर्षी पुरस्कारासाठी 100 हून अधिक संस्था व प्रतिनिधींचे अर्ज आयोजकांना संपूर्ण भारतातून प्राप्त झाले होते. उदयोन्मुख पुरस्कारासाठी दोन संस्थांची निवड करण्यात आली आणि 28 फेब्रुवारीला मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते मीडियाफोरम प्रा. लि.ला उदयोन्मुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे संस्थापक लोकेश नितनवरे, परितोष बरबटे व मुख्य व्यवस्थापक प्रबुद्ध गणविर हे उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना लोकेश नितनवरे म्हणाले की, हा पुरस्कार आम्हा सर्वांसाठी पुढे जाण्यासाठी ऊर्जा देणार आहे. पुढे बोलताना त्यांनी या क्षेत्रात येणार्या काळात खूप संधी निर्माण होणार असून युवकांनी नवीन संकल्पना घेऊन काम करावे व व्यवसायाची योजना आखून समाजातील तरुणांना रोजगार देणार असल्याचे सांगितले. परितोष बरबटे यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारिता व जाहिरात क्षेत्रात निर्माण झालेल्या संधीचे सोने करून काम करण्यास सुरूवात केली, त्याची फळे आज पुरस्कराच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी येणार्या युवकांना व्यवसायाचे मार्गदर्शन करणार असल्याचे बोलले. या वेळी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या संस्थेचे प्रतिनिधी व वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी उपस्थित होते. आभार अनिश चांदेरे यांनी मानले.