Breaking News

उरण एस टी आगार तोट्यात

कोरोनामुळे वर्षभरात कोट्यवधींचे नुकसान

उरण : वार्ताहर

कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केल्याने अनेक व्यवसायावर मंदी आली आहे. याच काळात प्रवासी वाहतूक बंद झाल्याने महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बस उरण आगाराचे दर महिन्याला सरासरी 40 लाख 14 हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले म्हणजेच वर्षभरात उरण बस आगाराला तब्बल चार कोटी 81 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले, अशी माहिती उरण आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली. या वेळी कार्यशाळा अधिक्षक मंगेश मुकादम, कर्मचारी आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे प्रवासी वाहतूक बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची वाहतूक उरण आगारातून केली जात होती. त्या वेळेस उरण आगारातून 15 गाड्या जीवनावश्यक साहित्य व वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी वाहतूक सुरू होती, तर बेस्टसाठी उरण आगारातून आठ गाड्या देण्यात आल्या होत्या. यातून मिळणारे उत्पन्न नियमितपेक्षा नगण्य होते.

लॉकडाऊन नियम शिथिल झाल्यावर शासनाच्या सूचनेनुसार एसटी बससेवा ही सर्व सामान्यांसाठी सुरू करण्यात आली, परंतु बस फेर्‍या सुरुवातीस कमी होत्या. आता उरण आगारातून 108 एसटी गाड्या सोडल्या जात आहेत, तर लॉकडाऊन पूर्वी 385च्या आसपास सोडल्या जात  होत्या. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेने फक्त 28 टक्के गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे एसटी आगाराला दर महिन्याला सरासरी 40 लाख 14 हजाराचे नुकसान सहन करावे लागत आहे.

उरण आगारातून पनवेल 42, दादर 27, शिर्डी 1, ठाणे 13 कल्याण 1, जासई मार्गे चिरनेर 4, न्हावा 3, अलिबाग 1, आवरे 1, खारपाडा मार्गे पनवेल 1, ठाणे 1, पेण 7, खारपाडा 1, आवरे मार्गे पनवेल 1, आवरे मार्केट 1, नंदुरबार 1, मालेगाव 1, कराड 1 आदी गाड्या सोडण्यात येत आहेत.

लॉकडाऊन पूर्वी 385च्या आसपास बसफेर्‍या सुरू होत्या. सध्या 108 गाड्या सुरू आहेत ग्रामीण भागातील मागणीनुसार प्रस्ताव शासन दरबारी सादर करून त्यात वाढ करण्यात येत आहे. या बसफेर्‍या सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य परिवहन मंडळ मुंबई विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आल्या आहेत.

-सतीश मालचे, आगार व्यवस्थापक, उरण

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply