विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे आश्वासन
पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील मोबाईल तसेच लँडलाइन संपर्काचा सद्यस्थितीत बट्टयाबोळ उडाला आहे. तालुक्यातील बीएसएलएलची दूरध्वनी व भ्रमणध्वनी तसेच इंटरनेट सेवा जवळजवळ परांगदा झाल्यामुळे खासगी कंपन्यांच्या सुविधेसाठीही ग्रामीण जनतेकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी नेटवर्कअभावी होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर हे शिमगोत्सवासाठी त्यांच्या जन्मगांवी कोतवाल बुद्रुक येथे आले होते. या वेळी कोतवाल विभागातील ग्रामस्थांनी जिओ नेटवर्कच्या मोबाइल टॉवरसाठी निवेदन देऊन मोबाइलसेवा सुरू होण्याची मागणी केली.
निवेदन देताना कोतवाल विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दरेकर, सरपंच गणेश कदम, सरपंच नामदेव शिंदे, माजी नगरसेवक प्रदिप पवार, उपसरपंच परशुराम दरेकर, केंद्रप्रमुख मारूती कळंबे, नामदेव शिंदे, पोलीस पाटील श्रीधर जाधव, केकेसीसी अध्यक्ष राजेश सकपाळ, मुंबई मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत दरेकर, सुभाष दरेकर, गिरिधर दरेकर, विजय दरेकर, श्रीकांत पार्टे, सुयोग दरेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी कोतवाल विभागातील ग्रामस्थांना आ. प्रवीण दरेकर यांनी विभागातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांची नेटवर्कची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.