नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोनाची दुसरी लाट आता संपूर्ण राज्यात धडकली आहे. या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह येत आहे. यामध्ये लहानमुलांनादेखील लागण होत आहे. त्यामुळे लहानमुलांची सर्वांत जास्त काळजी घेण्याचे आवाहन बबालरोगतज्ज्ञ करीत आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. प्रतिदिन 700 ते 900 नवीन रुग्ण वाढत आहेत. शहरातील रुग्णसंख्या 68 हजारपेक्षा जास्त झाली आहे. सात हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मनुष्यबळ कमी पडत आहे. वाढणार्या रुग्णांसाठी नवीन रुग्णालय सुरू करणे शक्य आहे. परंतु, वाढीच रुग्णालयांसाठी डॉक्टर्स व इतर तज्ज्ञ मनुष्यबळ कसे उपलब्ध करायचे, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा राहिला आहे. दुसर्या लाटेत सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा धोका वाढत आहे. पहिल्या लाटेत लहान मुलांची संख्या कमी होती, परंतु आता लहान मुलांमध्येही झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. 25 मार्चला 0 ते 10 वर्षे वयोगटातील 90 सक्रिय रुग्ण शहरात होते. पुढील एका आठवड्यात यामध्ये 98ची भर पडून सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 188 वर पोहचली आहे. प्रतिदिन 15 ते 22 लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असले तरी त्यांच्यामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत 10 वर्षे वयोगटातील फक्त एकाचाच मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये एका घरातील व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणार्या घरातील इतरांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाचा विळखा पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना होणार नाही, याची काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे. लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन महापालिकने केले आहे.
लहान मुलांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे, परंतु कोरोनाचे उपचार घेतल्यानंतर भविष्यात त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार, हे आताच सांगता येणार नाही. लहान मुले बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मुलांना कोरोना होणारच नाही, यासाठी पालकांनी योग्य काळजी घेतली पाहिले व नियमांचे पालन केले पाहिजे.
-प्रवीण गायकवाड, बालरोगतज्ज्ञ