Breaking News

वाढत्या कोरोनामुळे सिडकोच्या कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शासनाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना 5 एप्रिलपासून तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्येदेखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रवेशावर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी आणली आहे. सिडको महामंडळात सामान्य नागरिकांसोबतच इतर आस्थापना, एजन्सी व कंपनीतील अधिकारी त्याचप्रमाणे कंत्राटदार यांसारख्या अभ्यागतांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. यातून कोरोनाचा संसर्ग व प्रसार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व प्रकारच्या अभ्यागतांना सिडको भवन, रायगड भवन व सिडकोची अन्य सर्व कार्यालये येथे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सर्व अभ्यागतांना आवाहन करण्यात आले आहे की, पुढील सूचनेपर्यंत सिडको भवन, रायगड भवन व सिडकोची अन्य कार्यालये येथे भेट देऊ नये. या अभ्यागतांना अतिशय तातडीचे काम असल्यास त्यांनी पत्रव्यवहार, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ईमेल अथवा मेसेजद्वारे संबंधित अधिकारी/कर्मचार्‍याशी संपर्क साधावा, अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अभ्यागतांना ई-व्हिजिटर्स प्रणालीच्या माध्यमातून भेटता येऊ शकणार आहे. ही प्रणाली सिडकोतर्फे विकसित करण्यात आली असून त्याविषयीची विस्तृत माहिती सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अपवादात्मक परिस्थितीत ज्या अभ्यागतांना प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल अशांचे आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल निगेटीव्ह आल्यापासून केवळ 48 तासांमध्येच त्यांना विभाग प्रमुखांकडून विशेष व्हिजिटर पास जारी करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या व्हर्च्युअल प्रणालींद्वारेही अभ्यागतांना संबंधित विभागप्रमुखांना भेटता येणार आहे. यात प्रामुख्याने एम एस टीम्स, झूम, वॉट्सप व्हिडीओ, गुगल मीट यांसारख्या प्सचा समावेश आहे. या अ‍ॅप्सद्वारे भेट घ्यायची असल्यास अ‍ॅप्सचा तपशील सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यागतांनी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यासाठी 022-67918100 या क्रमांकाचा वापर करावा.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply