अलिबागमध्ये त्रिकुटाला अटक
अलिबाग : प्रतिनिधी
बनावट नोटा छापून त्या चलनात आणणार्या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अलिबागमधून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून बनावट नोटांसह त्या तयार करण्यासाठी लागणारी सामग्री हस्तगत केली आहे. जयदीप घासे, सुमीत बागकर आणि कौस्तुभ गिजम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अलिबाग शहरालगत मांडवा बायपास येथे मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी अशोक पोकळे या कांदेविक्रेत्याकडून कांद्याच्या दोन गोणी खरेदी केल्या. या गोणींची रक्कम म्हणून त्याला 100 रुपयांच्या 22 नोटा दिल्या. या नोटा बनावट असून आपली फसवणूक झाली असल्याचे पोकळे यांच्या नंतर निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हाची नोंद झाली. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांडवा बायपास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेली गुप्त माहिती याच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, दोन जण हाती लागले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात घेतले. तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून नोटा छापण्यासाठी लागणारे प्रिंटर्स, लॅपटॉप, शाई, कागद, तसेच शंभर, दोनशे आणि पाचशे अशा दरांच्या एकाच बाजूने छापलेल्या 49 हजार 900 रुपयांच्या नोटा असा मिळून 27 हजार 500 रुपये असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीनही आरोपींना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सुरू आहे.