आरोपी पत्नीसह प्रियकराला अटक
पनवेल : वार्ताहर
प्रेमात अडसर ठरणार्या पतीला पत्नीने प्रियकराच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गपचूप पळून जाणार्या पत्नी आणि प्रियकराला मानपाडा पोलिसानी अवघ्या तीन तासांच्या आत अटक केली.
मारुती लक्ष्मण हांडे (वय 55, रा. कर्जत) यांचे संध्या सिंग नावाचे मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्न केल्यानंतर ते डोंबिवलीजवळील कोळेगांव येथे वर्षभरापासून राहात होते. तिथे संध्या सिंग हिचे त्याच भागात राहणारा वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याचेसोबत प्रेमसंबंध जुळले. ही बाब मारुती हांडे यांना समजल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे संध्या सिंग व वेदांत शेट्टी यांनी त्यांच्या प्रेमात अडसर ठरणार्या मारुती हांडे यांना ठार मारण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मारुती हांडे हा दुपारी त्याचे घरात जात असताना वेदांत शेट्टी याने स्टंपने मारुती हांडे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये मारूती हांडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने रवाना झाले. संध्या सिंग व वेदांत शेट्टी यांचा त्यांचे पत्त्यावर शोध घेतला असता, ते नसल्याचे आढळले. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने पळून जात असताना डोंबिवली परिसरातून अवघ्या तीन तासांत अटक केली.