अत्यावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची गर्दी
रोहे ः प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे रायगड जिल्हा बंद राहणार असल्याने अत्यावश्यक साहित्यासह भाजीपाला, किराणा माल व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बुधवारी (दि. 15) शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोहा बाजारपेठेत आल्याने रोहा बाजारपेठ नागरिकांनी हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले.
रोहा शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रोहा, वरसे व धाटाव येथे 3 जुलैपासून जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. या वेळी नागरिकांनी पूर्णपणे जनता कर्फ्यूचे पालन केले होते. रोहा बाजारपेठेसह ग्रामीण भागातील बाजारपेठ व गावातील दुकाने बंद होती. त्यानंतर आता रायगड जिल्हा बंद राहणार असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक सेवा व अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.
भाजीपाला, किराणा साहित्य, मुलांना खाण्यासाठीच्या वस्तू व अन्य साहित्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात आले होते. मंगळवारी सायंकाळी रोह्यात काही किरकोळ दुकाने उघडली होती, परंतु बुधवारी मात्र भाजीपाला, मटण-मच्छी मार्केट, किराणासह कापड, मिठाई व अन्य सर्व दुकाने सुरू होती.
शहरासह ग्रामीण भागातील लोक दुचाकीसह चारचाकी वाहने घेऊन बाजारात आल्याने खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. ठिकठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केल्याने बाजारात वाहतूक कोंडी झाली होती. विशेषतः वीर सावरकर रोड व रोहा एसटी स्टँडसमोर वाहतूक कोंडी दिसून आली. पुढील 10 दिवस बाजारपेठ बंद राहणार असल्याने अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करताना नागरिक दिसत होते.
19 जणांची कोरोनावर मात
रोहा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात मागील 10 दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती, परंतु बुधवारी (दि. 15) रोहा तालुक्यात 19 जण कोरोनावर मात करीत बरे होत घरी गेल्याने रोहेकरांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी रोहा शहरात एकच पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
रोहा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले होते. दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासन हैराण झाले होते. रोहा शहरानंतर ग्रामीण भागात विशेषतः वरसे ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत होते. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणार्यांची संख्याही वाढत होती. बुधवारी रोहा शहरात वीर सावरकर रोड एसटी स्टँडजवळ 57 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याने रोहा तालुक्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 292 एवढी झाली आहे.
बुधवारी 19 व्यक्तींनी कोरोनावर मात करीत बरे होत घरी गेल्याने रोहा तालुक्यात आतापर्यंत 205 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे रोहा तालुक्यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रोह्यात आता 82 सक्रिय कोरोनाबाधितत रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.