Breaking News

भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहणार -जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते

मुरुड : प्रतिनिधी 

सततच्या लॉकडाऊनमुळे आज व्यापारी व जनता त्रस्त आहे. मिनी लॉकडाऊन सांगून प्रत्यक्षात सर्वच दुकाने बंद करणे, ही महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका आम्हाला कदापी मान्य नाही. भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी येथे पत्रकार

परिषदेत दिली.

अ‍ॅड. महेश मोहिते यांनी बुधवारी मुरूड येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, त्यात ते बोलत होते. केवळ विकेंडला लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध लावले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण लॉकडाऊन करुन या महाविकास आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप या वेळी अ‍ॅड. यांनी केला.

अलिबाग व मुरुडमध्ये सर्व दुकाने बंद करण्यास मोठा विरोध झाला आहे. लोकांना रोजगार नाही तर दुकाने नुकतीच सुरू झालेली असताना ती बंद करण्याचा निर्णय घेणे हे साफ चुकीचे आहे. चेंबर ऑफ कॉमर्सनेसुद्धा याला विरोध केला असून लवकरच ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. व्यापार्‍यांनी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करणार व वेळ पडल्यास आंदोलनसुद्धा करणार असल्याचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी सांगितले.

लॉकडाऊन वाढला तर भूक बळींची संख्या वाढणार आहे. राज्य सरकारने बंधने वाढवावीत, दंड वसूल करावा मात्र दुकाने बंद करणे हा पर्याय योग्य नसल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

भाजपचे मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, मुरुड शहर अध्यक्ष उमेश माळी, तालुका उपाध्यक्ष बाळा भगत, सरचिटणीस नरेश वारगे, संघटक प्रवीण बैकर, अमीर खानजादा, महेश मानकर, कृष्णा किंजले या वेळी उपस्थित होते. अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी मुरुड शहरातील व्यापार्‍यांची भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply