Breaking News

पनवेल महापालिका हद्दीत सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीवजा सूचना

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेता कोविड रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदनाद्वारे मागणीवजा सूचना केली आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 7 एप्रिलचा रिपोर्ट पाहता कोरोना रुग्णांची एका दिवसातील संख्या पाचशेच्यावर गेली आहे. दिवसेंदिवस कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता वैद्यकीय उपचार देण्यास शासकीय यंत्रणा कमी पडत आहे. अनेक खासगी हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन, बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून, काहींना अतिशय तुटपुंज्या वेतनावर, तसेच उद्योगधंदा सुरळीत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आकारण्यात येणारा खर्च हा न परवडणारा असल्यामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी पनवेल महापालिका हद्दीत तातडीने सुसज्ज असे जम्बो कोविड सेंटर निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तत्काळ सादर करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply