Breaking News

महाडमध्ये फाशात अडकून बिबट्याच्या मृत्यू

महाड : प्रतिनिधी

जंगलात डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील टोळ गाव परिसरात असलेल्या जंगल परिसरात समोर आली आहे. मृत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत एका तारेत अडकल्याचे आढळून आले. हा बिबट्या किमान चार दिवसांपूर्वी अडकून मृत झाल्याचा अंदाज आहे.

याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर महाड वन विभागाचे पथक गुरुवारी रात्री टोळ परिसरात पोहोचलेे. रात्री 10च्या सुमारास ज्या ठिकाणी बिबट्या मृत पावला होता ते घटनास्थळ पथकाला सापडले. शुक्रवारी सकाळी या बिबट्याचा रीतसर पंचनामा करून त्याचे शवविच्छेदन महाड शहरातील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावळे यांनी केले.

यापूर्वी वरंध विभागातील सुनेभाऊ गावालगत असलेल्या जंगलातदेखील फाशात अडकलेल्या अवस्थेत बिबट्या आढळून आला होता. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला होता; तर केंबुर्ली गावानजीक महामार्गावर एका बिबट्याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्यप्राणी भटकत असल्याने ते अवैध शिकारीचे बळी ठरत आहेत. त्यावर निर्बंध येणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात जंगल परिसरात बिबट्याचा आणि डुकरांचा वावर आहे. पिण्याच्या पाण्याच्या शोधात हे गावालगत येत असतात, मात्र हे वन्यप्राणी अवैध शिकारीचे बळी ठरत आहेत. अशा अवैध शिकार्‍यांची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला द्यावी.

-प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल महाड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply