कर्जत : बातमीदार
नेरळ ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य केतन पोतदार यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेली पहिली नेरळ ग्रामीण कबड्डी लीग नेरळ लायन्स संघाने जिंकली. नेरळ आणि परिसरातील ग्रामीण कबड्डी संघातील नामांकित खेळाडू यांचे आठ व्यवसायिक संघ स्पर्धेत सहभागी झाले आहे. या वेळी बोलताना प्रो-कबड्डीपटू नीलेश साळुंखे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपला नैसर्गिक खेळ करावा, असे आवाहन केले.
नेरळ गावातील शिवाजी महाराज मैदानात ग्रामीण कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले होते. या लीगचे उद्घाटन मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या हस्ते झाले. 2 आणि 3 मार्च या दोन दिवस भरविण्यात आलेल्या कबड्डी लीगमध्ये नेरळ लायन्स, सेव्हन स्टार, एसडी शूटर्स, बीईएस फायटर्स, स्वराज्य फायटर्स, एसएम टायगर, अक्षर रॉकर्स, देवपाडा वॉरियर्स हे आठ व्यावसायिक संघ सहभागी झाले होते. साखळी पद्धतीने खेळविल्या गेलेल्या दोन दिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना रूपेश देसाई-मंगेश पवार यांच्या नेरळ लायन्स संघाने सूरज डायरे यांच्या एसडी शूटर्स संघावर मात करून जिंकला. तिसर्या क्रमांकावर सेव्हन स्टार वॉरियर्स आणि चौथ्या क्रमांकावर बीईएस फायटर्स संघाला समाधान मानावे लागले. करण खडे हा खेळाडू स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरला. स्पर्धेचे व्यवस्थापन ग्रामीण भागातील नामांकित खेळाडू दिलीप डायरे, गणेश चहाड, कल्पेश पवार, कल्पेश राणे आणि तेजस राणे यांनी केले, तर पंच म्हणून ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच ठेवण्यात आले होते.
स्पर्धेच्या निमित्ताने प्रो-कबड्डीमधील स्टार खेळाडू नीलेश साळुंखे यांनी उपस्थिती लावली.त्यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना कानमंत्र देताना स्पर्धा सर्व क्षेत्रात असून आपला नैसर्गिक खेळ कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे दुसर्यांची कॉपी करण्यापेक्षा आपल्या नैसर्गिक खेळाकडे लक्ष द्या, असे आवाहन केले. महाडसारख्या ठिकाणी जन्मलो असलो, तरी आपला आपल्या खेळावर विश्वास असल्याने पुढे संधी मिळत गेली. नेरळमधील अशा लीग स्पर्धा सर्व ठिकाणी झाल्या पाहिजेत, असे सांगून त्यातून चांगल्या खेळाडूंना व्यासपीठ मिळेल, असा विश्वास या वेळी नीलेश साळुंखे यांनी व्यक्त केला.