नवीन डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णांची गैरसोय होणार दूर
पनवेल ः प्रतिनिधी
कोरोनाच्या जागतिक संकटाला वर्ष झाले तरी ती भयावह परिस्थिती अजूनही तशीच आहे. आपल्या स्वकीयांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शासकीय व महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार करताना डॉक्टर व कर्मचारी कमी पडत असल्याने या परिस्थितीत बदल करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 9) उपजिल्हा रुग्णालय व शनिवारी (दि. 10) कळंबोली येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन महापालिकेला नवीन डॉक्टरांचे मानधन वाढविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता नवीन डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.
सध्या देशभर सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फतही योग्य त्या उपाययोजना केल्यात जात आहे, पण महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करताना डॉक्टर व कर्मचारी कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात सध्या 140 कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ऑक्सिजन लावलेले 60 रुग्ण, आसीयूमधील आठ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या उपचाराकरिता कमीत कमी दोन फिजिशिअन, दोन भूलतज्ज्ञ, तसेच 10 वॉर्डबॉय, दोन औषधनिर्माता एवढ्या मनुष्यबळाची गरज असून, सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात एक फिजीशिअन गेले चार महिन्यांपासून एकट्याच कार्यरत आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ पुरविल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल. सद्यस्थितीत नवी मुंबईच्या रुग्णालयात भूलतज्ज्ञ व फिजीशिअन 2.50 लक्ष एवढे मानधन घेत असून, त्याच मानधनावर आपल्या उपजिल्हा रुग्णालयात आणि कळंबोली जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांना मानधन दिल्यास ते रुग्णालयांत काम करण्यास उपलब्ध होऊ शकतात यासाठी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी आयुक्त सुधाकर देशमुख व आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र दिले होते.
या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह शुक्रवार उपजिल्हा रुग्णालय आणि शनिवारी कळंबोली येथील कोविड रुग्णालय येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, उपायुक्त संजय शिंदे, आनंद गोसावी उपस्थित होते.
कळंबोली येथील रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात साजरा केला, पण या रुग्णालयाची सुसूत्रता ठेवण्यात आली नाही. कळंबोली जम्बो कोविड सेंटर अधिक कार्यक्षम व्हावे यासाठी कोणत्या सुविधा देणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीत रुग्णांना बेड कोठे उपलब्ध आहेत याची अद्यावत माहिती कशी देता येईल. रुग्णालयात डॉक्टर, औषधे, ऑक्सिजनची व्यवस्था कशी करता येईल याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. उपायुक्त संजय शिंदे यांनी नवीन नेमण्यात येणार्या डॉक्टरांना मानधन वाढवण्याचे मान्य केले. त्यामुळे आता महापालिकेकडे डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.