मुंबई ः प्रतिनिधी
रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात विलेपार्ले पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिकार्याला ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारला. पोलीस ठाण्यात वाद झाल्यानंतर तेथील अधिकारी आणि भाजप नेते बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहचले. या वेळी भाजपने ब्रुक फार्माविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर अखेर ब्रुक फार्माचे अधिकारी राजेश डोकानिया यांना सोडण्यात आले. महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजक्शने मिळावित या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकार्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे, असे फडणवीस यांनी ट्विट करीत म्हटले आहे. पोलीस आयुक्तालयाबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो. विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी 10 पोलीस त्यांना ताब्यात घेतात हे सारेच अनाकलनीय आहे. पोलीस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना तसेच अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
आम्ही रेमडेसिवीर महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना इथे मात्र राजकारण सुरू आहे. आम्ही महाराष्ट्राला मदत करण्यासाठी काम करीत असून, फक्त आम्ही करीत आहोत म्हणून त्रास दिला जात असेल तर योग्य नाही.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा