Breaking News

‘भारत बंद’ अयशस्वी

खोपोलीत व्यापारी व बंद समर्थकांमध्ये खडाजंगी; पोलिसांची मध्यस्थी

खोपोली : बातमीदार
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (इव्हीएम) विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स, तसेच विविध संघटनातर्फे बुधवारी (दि. 29) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला खोपोलीत गालबोट लागले. या वेळी आंदोलक आणि व्यापारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करून वातावरण शांत केले.
बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते खोपोली शहरातील व शीळफाटा येथील दुकाने, बाजार बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले असता, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने घेतलेल्या निर्णयानुसार कोणताही व्यापारी आपले दुकान बंद ठेवणार नाही या भूमिकेवर येथील व्यापारी असोसिएशन ठाम होते. शीळफाटा येथे दुकाने बंद करण्याचे निर्देश देणार्‍या बंद पुरस्कर्ते व दुकाने बंद होणार नाहीत अशी भूमिका घेतलेल्या व्यापारी वर्गात चांगलीच जुंपली व यातून मोठा वाद निर्माण झाला.
या गंभीर स्थितीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर मोठा पोलीस फौजफाटा घेऊन शीळफाटा येथे दाखल झाले. त्यांनी बंद पुरस्कर्ते व व्यापारी आणि व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात विशेष बैठक घेऊन समेट घडवून आणला. त्यानुसार दुकाने सुरू ठेवण्याचे बंद पुरस्कर्त्याकडून मान्य करण्यात आल्यावर येथील वातावरण निवळले. निर्माण झालेल्या बिकट स्थितीत कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी व्यापारी असोसिएशनचे राजेंद्र फक्के, राजू अभानी, कमाल पाटील अन्य सदस्यांनी यशस्वीपणे मध्यस्ती मार्ग काढण्यास योगदान दिले.
नेरळमध्येही धावाधाव
कर्जत : नेरळमध्ये बंद समर्थक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात चढाओढ दिसून आली. खोपोलीप्रमाणेच नेरळ येथेही पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दोन तासांनी बाजारपेठ पुन्हा खुली झाली.
नेरळ येथील बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे बाजारपेठेत फिरून बंदमध्ये सहभागी होण्यास सांगत होते. त्याच वेळी भाजपचे अनिल जैन, रणजित जैन, नितीन कांदळगावकर, गणेश शेळके, तसेच इतर कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन दुकानदार व व्यापार्‍यांना केले. बंदबाबत दोन्ही बाजूंनी सुरू असलेली चढाओढ लक्षात घेऊन नेरळ पोलिसांचा ताफा बाजारपेठेत पोहोचला. या वेळी सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी सर्वांना पांगविले. यादरम्यान कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकर्ते नेरळमध्ये दाखल झाले व हे सर्व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सम्राट नगर प्रवेशद्वारापाशी थांबून होते. पोलीस अधिकार्‍यांनी दोन तास बंद झाला असून, आता सर्वांनी घरी जावे, असे आवाहन केले. मग बाजारपेठ पूर्ववत झाली.
बंद सरकार पुरस्कृत; मनसेचा आरोप
मुंबई : बहुजन क्रांती मोर्चा व अन्य संघटनांनी पुकारलेला बंद हा राज्यातील महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. राज्य सरकारच बंद पुकारत आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. भारत बंदबाबत नेमके तेच घडत आहे, असेही ते म्हणाले.
हिंसक वळण : आंदोलकांची धरपकड, लाठीचार्ज
अलिबाग : बहुजन क्रांती मोर्चा, शेकाप, तसेच अन्य संघटनांतर्फे रायगड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पनवेलसह जिल्ह्यात अल्प प्रतिसाद लाभला. बंददरम्यान जिल्ह्यातील अनेक ठिकाणची दुकाने, व्यवहार सुरू होते. सार्वजनिक वाहतूकही सुरळीतपणे चालू होती. दरम्यान, सांगली, धुळे या ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले आहे. पुण्यात 250 आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली, तर पालघरमध्ये लाठीचार्ज केला. अनेकांनी रस्त्यावर उतरून या बंदला आपला विरोध दर्शविला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply