मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असताना राज्य सरकार केवळ आरोपबाजीत दंग आहे. केवळ केंद्र सरकारवर आरोप करून चालणार नाही तर रुग्णांना योग्य उपचार सेवा सुविधा दिली पाहिजे. नियोजनाअभावी राज्यात कोरोनाच्या प्रसारावर राज्य सरकार नियंत्रण करू शकले नाही. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा; रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कोरोनाचा कहर राज्यात वाढला आहे. रुग्ण संख्या वाढत आहे. प्रत्येक रुग्णाला बेड, ऑक्सिजन आणि औषधे पुरविण्याकडे राज्य सरकार ने लक्ष द्यावे. कोरोनाला रोखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. रुग्णांना सेवा पुरविणे राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका यांचे काम आहे. केवळ केंद्रावर आरोप करून चालणार नाही. उलट सुलट स्टेटमेंट देणे थांबवा, असे आवाहन आठवलेंनी केले आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत.सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहे. महराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसिवीरसह सर्व औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये. मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे, मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
रेमडेसिवीरचा गेमडीसिवीर करू नका
रेमडेसिवीरचा गेमडीसिवीर करू नका, रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही.राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवुन आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला.