पनवेल : रामप्रहर वृत्त
सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करदात्यांमध्ये असलेले संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्रुप (बी.बी.एन.जी) या संस्थेच्या वतीने ऑनलाइन चर्चासत्राचा कार्यक्रम झाला. यामध्ये पनवेल येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल श्रीकांत लिमये यांनी वेबीनारच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील तसेच गुजरात वगैरे राज्यातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. या वेळी श्रीकांत लिमये यांनी त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. गिरीश शास्त्री आणि सौरभ कर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रीकांत लिमये यांचे गेल्या महिनाभरात 18 मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले. श्रीकांत लिमये यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, सध्या आपली अर्थव्यवस्था स्थिर रहावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. रिटर्न फाइल तसेच आयकर, जीएसटी आदी भरण्यासाठी 30 जूनपर्यंत देण्यात आलेली मुदत ही दिलासादायक आहे. यामुळे सन 2019-20 मधील राहिलेली गुंतवणुक 30 जूनपर्यंत करण्याची संधी गुंतवणुकदारांना तसेच करदात्यांना उपलब्ध झालेली आहे. भविष्यातही अशा प्रकारची आपत्ती आली असता प्रत्येक व्यावसायिकाने आत्तापासूनच सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या उद्योगधंद्याचा व वैयक्तीक जो मासिक खर्च आहे त्याच्या किमान पाचपट रक्कम ही बचत खाते, आवर्त ठेव, मुदत ठेव अशा रोख स्वरूपात गुंतविण्याचा सल्ला ही त्यांनी दिला.