आमदार प्रशांत ठाकूर यांचे आश्वासन; स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा
पनवेल : वार्ताहर
कळंबोलीमधील सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच भेडसावणार्या विविध समस्यांवर स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांच्यासह सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करून त्या समस्या प्रामुख्याने मांडल्या तसेच लवकरात लवकर या समस्या सोडविण्याची मागणी केली. या वेळी कळंबोलीतील समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकार्यांना दिले.
कळंबोलीतील रस्ते व गटारांच्या समस्या, कळंबोली कामोठे जोड रस्ता ते तलावापर्यंतच्या रस्त्याचे विस्तारीकरण, कामोठे बस स्टॉप ला जाण्यासाठी पीडब्लूडीमार्फत ब्रिज खाली रस्त्याचे व्यवस्थित काम व रात्री विद्युत रोषणाई, रस्त्यावर गाड्या पार्किंग या सम व विषम तारखेप्रमाणे करून आवश्यक तिथे पार्किंग झोन, पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात चांगले काम करावे म्हणून आदर्श प्रभाग व आदर्श नगरसेवक निवड, जनता दरबार, मराठा आरक्षण आंदोलनातील निर्दोष व्यक्तींचे गुन्हे रद्द करण्याबाबत, आपात्कालीन व्यवस्थेच्या निर्मिती तसेच यावेळी कळंबोलीतील राम मंदिराची दुरुस्ती करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे साहीत्य लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
याचबरोबर इतर विषयावर सकारात्मकपणे मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्थेच्या पदाधिकार्यांना दिले. या वेळी विजया कदम, शुभांगी निर्मळे, भरत कोरडे, राम मंदिर अध्यक्ष संतोष मोकल, महादेव क्षीरसागर, भिमराज खामकर, पांडूरंग जाधव, गणेश लाड, सुशांत कापरे आदी उपस्थित होते. दरम्यान, शिष्टमंडळाने आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सुद्धा दिल्या.