पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेत अत्यावश्यक कर्मचार्यांनी दुसर्या लाटेपूर्वी कोरोना प्रतिबंधकाच्या दोनही लसींचा डोस घेतल्याने पनवेल महापालिकेचे व पोलीस विभागाचे कर्मचारी दुसर्या लाटेत सुरक्षित असल्याचे उजेडात येत आहे. दुसर्या लाटेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील आणि पनवेल पालिका कर्मचार्यांच्या एकूण बाधितांची संख्येमुळे ही बाब समोर आली आहे.
पनवेलमध्ये सुमारे 16 हजार सरकारी कर्मचार्यांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यात 160 कर्मचारी आहेत. त्यापैकी दोनही लसींची मात्रा सुमारे 145 कर्मचारी व अधिकार्यांनी दुसर्या लाटेपूर्वीच घेतली होती. दुसर्या कोरोनाच्या लाटेत अवघ्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली, मात्र लागण झालेल्यांनाही कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, तसेच उपचारातून बरे होईपर्यंत कोणताही वैद्यकीय त्रास झाला नाही. मागील वर्षीच्या कोरोना लाटेत पन्नासहून अधिकांना कोरोनाची बाधा झाली होती. अशीच स्थिती पनवेल पालिकेतील कर्मचारी व अधिकार्यांची आहे.
सुमारे साडेसहाशे आस्थापनावरील कर्मचार्यांची संख्या असलेल्या पालिकेत अवघे तीन ते चार जणांना दुसर्या लाटेत कोरोना झाला, मात्र कोरोनाबाधितचा अहवाल आल्यानंतरही वैद्यकीय त्रास जाणवला नाही. ही बाब कोरोना युद्धातील सर्वच अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी दिलासा देणारी असली तरी मुखपट्टी वापरणे, सामाजिक अंतर पाळणे हे नियम पाळण्याविषयीचे आदेश संबंधित आस्थापनाच्या वरिष्ठांनी कर्मचार्यांना दिल्या आहेत. पनवेलमध्ये लसीकरणाच्या पात्रतेनुसार एकूण साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अत्यावश्यक आहे, मात्र अजूनपर्यंत 70,489 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याकडून येणार्या अपुर्या लसींच्या पुरवठ्यामुळे रविवारी कोविशिल्ड 2000 व कोवॅक्सीन 1000 पनवेल पालिकेला मिळाल्या होत्या. दिवसाला अडीच हजार लसी पनवेल पालिका क्षेत्रात देण्याचे नियोजन पालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. सरकारी कार्यालयात अत्यावश्यक कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा लाभ पनवेलमध्ये पाहायला मिळत आहे, असे पनवेल मनपाचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.
पोलिसांना दुसर्या लाटेतही रस्त्यावर थेट नागरिकांशी संपर्क करावा लागत आहे. मागील लाटेपेक्षा या लाटेत लसीकरणाचा लाभ झाल्याचे पोलीस कर्मचार्यांमध्ये दिसून येत आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस मुखपट्टी घालूनच कायदा व सुव्यवस्था राबवत आहे. मात्र यावेळी लसीकरणामुळे बाधितांची संख्या पोलिसांमधील कमी असल्याचे जाणवते. तसेच कोरोनाच्या लागणनंतरही त्रासही कमी झाला. -अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल