माणगाव : प्रतिनिधी
कोरोना महमारीचे संकट कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन, कडक निर्बंध, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही गावोगावी होणारे चैत्र पौर्णिमेचे कार्यक्रम, जत्रा, पालखी सोहळे होणार नसल्याने आबालवृद्धांच्या आनंदावर विरजण पडले आहे. कोकणात विशेष आकर्षण असलेल्या ग्रामदैवतांच्या यात्रा चैत्र पौर्णिमेपासून सुरू होतात. यावर्षी 27 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे. या पौर्णिमेपासून माणगाव तालुक्यातील जत्रोत्सव सुरू होत असतो. यानिमित्ताने ग्रामदैवतांचा जागर करण्यात येतो, पालखी मिरवणूक काढली जाते. पालखी सोबत उंच बाबूंच्या सजवलेल्या काठ्या नाचविणे मानाचे व धार्मिकतेचे मानले जाते. या काठ्यांना घुंगरू व रंगीबेरंगी कापडाने सजविले जाते. ढोलताशांच्या गजरात या काठ्या नाचविल्या जातात व ते पाहणे मनोरंजक असते. जत्रातून प्रतिवर्षी लाखोंची उलाढाल होत असते. खाऊ मिठाई व घरगुती साहित्याची मोठी खरेदी केली जाते. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. मनोरंजन व इतर कार्यक्रम सादर होत असतात. त्यानिमित्ताने स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळते. चाकरमानी हमखास जत्रेला गावी येत असतात. कोरोनामुळे गेल्या वर्षी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतांचे जत्रोत्सव साजरे करण्यात आले होते. परंपरेप्रमाणे होणारे पालखी सोहळे, इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यावर्षीही कोरोना महामारीचे संकट कायम आहे. राज्यात लॉकडाऊन, कडक निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने या निर्बंधात वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमे (दि. 27) पासून सुरू होणारे ग्रामदैवतांचे उत्सव, जत्रा यावरही बंधने आली आहेत. सलग दुसर्या वर्षीही माणगाव तालुक्यात जत्रा, पालखी सोहळे होणार नसल्याने आबालवृद्धांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरवर्षी जत्रेत खेळणी, गृहोपयोगी वस्तू विक्रीचे दुकान असते. त्यासाठी घावूक स्वरूपात माल खरेदी करतो.गेल्या वर्षी जत्रेसाठी घेतला माल कोरोनामुळे तसाच राहिला. यंदा तो संपेल असे वाटत होते. मात्र यावर्षीही जत्रा रद्द होतील. त्यामुळे सलग दुसर्या वर्षी नुकसान होणार आहे.
-शिवराम भागडे, स्थानिक व्यवसायिक, माणगाव
तालुक्यातील माणगाव, इंदापूर, साई येथील जत्रा प्रसिद्ध आहेत. तसेच प्रत्येक गावात चैत्र पौर्णिमेचे कार्यक्रम होेतात. मात्र सलग दुसर्या वर्षी त्यावर निर्बंध आल्याने आबालवृद्धांना त्याचा आनंद घेता येणार नाही.
-रामदास जाधव, सामाजिक कार्यकर्ता, माणगाव.