मुंबई ः प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे मंगळवारी (दि. 20) दुपारी 12.30च्या सुमारास निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करीत असत. त्यांनी 1960-61च्या सुमारास ‘आमराई’ या नाटकात काम केले. हेच त्यांचे पहिले नाटक ठरले. त्यानंतर त्यांनी 40 नाटके, 30हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच 20हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. मराठीप्रमाणेच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यांना हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …