Breaking News

डिझेल परताव्यासाठी जनआंदोलन करणार

मनोहर बैले यांचा इशारा

मुरुड : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात मत्स्यविभागाकडून डिझेल परतावा रक्कम प्राप्त झालेली नाही. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा  डिझेल परतावा मिळत नसल्याने जिल्ह्यातील मच्छीमार त्रस्त झाले आहेत. आता डिझेल परतावा मिळविण्यासाठी मच्छीमारांचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर बैले यांनी बुधवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत दिला.

मच्छीमारांच्या जनआंदोलनसंदर्भात माहिती देण्यासाठी मनोहर बैले यांनी त्यांच्या मुरूड येथील निवासस्थानी बुधवारी पत्रकार परिषद बोलावली होती, त्यात ते बोलत होते. या वेळी सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू, रोहिदास मकू, बाबूराव कुलाबकर उपस्थित होते.

डिझेल परतावा रक्कम मिळावी, यासाठी शासन दरबारी अर्ज विनंत्या केल्या, जिल्ह्यामधील विविध मच्छीमार सोसायट्या शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मत्सविकासमंत्री अस्लम शेख यांच्यासमवेत सह्याद्री अतिथी गृहात दोन महिन्यापूर्वी बैठक घेतली. त्यात तातडीने डिझेल परतावा मिळेल असे सांगण्यात आले होत, मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या परतावा रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे लवकरच मोठे जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची तयारी सुरू झाल्याची माहिती मनोहर बैले यांनी पत्रकारांना दिली.

मुरुड तालुक्यातील काही मच्छीमार संस्थांना क्यार वादळात झालेल्या नुकसानीचे पैसे देण्यात आलेले नाहीत. कोरोनामुळे मासळी बाजारात विकता येत नाही. त्यामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे. आमच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मच्छिमार, कामगार, मासळी विक्रेत्या महिला यांच्या कुटुंबाला 25 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली असल्याची माहिती या वेळी बैले यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply