पनवेल : वार्ताहर
चेन्नई येथून तळोजा येथे पोहचवण्याची जबाबदारी सोपविलेल्या कंटेनर चालकाने कंटेनेरमधील तब्बल 26 लाख रुपये किमतीचे डेल कंपनीच्या मॉनिटरचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. शमीम खुर्शीद खान (वय 25) असे या कंटेनर चालकाचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.
चेन्नई येथील ब्ल्यु डार्ट कंपनीचे मॅनेजर रणजित कुमार यांनी गत 31 मार्च रोजी चैन्नई येथून तळोजा येथे 800 डेल कंपनीचे मॉनिटरने भरलेले बॉक्स व 26 इतर मॉनिटरचे बॉक्स पोहोचविण्याची जबाबदारी सेंच्युरी कार्गो कॅरीअर प्रा.लि. या कंपनीच्या चेन्नई येथील कार्यालयाला दिली होती. त्यानुसार सेंच्युरी कार्गो कंपनीने शौकीन सनाब खुर्शीद खान या कंटेनर चालकाला 32 फुटी ट्रेलरमध्ये मॉनिटरचे बॉक्स भरून ते तळोजा येथे पोहचविण्यास सांगितले होते, मात्र कंटेनरवर शौकिन खान हा चालक म्हणून न जाता, त्याने त्याचा भाऊ शमीम खान याला पाठवुन दिले. 1 एप्रिल रोजी सायंकाळी शमीम याने चेन्नई येथून कंटेनरमध्ये मॉनिनटरचे बॉक्स भरल्यानंतर तो तळोजा येथे जाण्यासाठी निघाला होता, मात्र यादरम्यान, त्याने कंटेनरमधील तब्बल 26 लाख रुपये किंमतीचे 70 डेल कंपनीचे मॉनिटर बाहेर काढुन त्यांचा अपहार केला.
यानंतर त्याने 3 एप्रिल रोजी सायंकाळी त्याची मुलगी मयत झाल्याने मालाचा कंटेनर कर्नाटक धारवाड टोलनाक्याजवळील मेवाती ढाब्याजवळ थांबवुन आपल्या गावी जात असल्याचे कार्गो कंपनीतील सुपरवायझरला फोनवरुन सांगितले. त्यामुळे कार्गो कंपनीने हा कंटेनर तळोजा येथे आणण्यासाठी अबिद खान याला धारवाड येथे पाठवुन दिले. अबिद खान हा त्याच दिवशी रात्री धारवाड येथे पोहचल्यानंतर त्याने कंटनेचे सील व्यवस्थीत असल्याची खात्री करून सदर कंटेनर दुसर्या दिवशी रात्री तळोजा येथे आणला. त्यानंतर कंटनेरमधील माल बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यातील 70 डेल कंपनीचे मॉनिटर कमी असल्याचे आढळुन आले. त्यानंतर चालक शमीम खुर्शीद खान यानेच सदर कंटेनर मधील मॉनिटरचा अपहार करुन पलायन केल्याचे लक्षात आल्यानंतर कार्गो कंपनीच्या अधिकार्याने तळोजा पोलीस ठाण्यात शमीमविरोधात तक्रार दाखल केली.