नांदेड ः प्रतिनिधी
किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड ता. किनवट येथील एकलव्य निवासी मॉडेल पब्लिक स्कूलच्या नवीन इमारत संकुलाचे ई-उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून नुकतेच करण्यात आले. या समारंभास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री हंसराज अहिर, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम एकलव्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी सहस्त्रकुंड ता. किनवट येथे शाळेच्या नवीन इमारतीत ऑनलाइन पाहिला. या वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल, कार्यकारी अभियंता पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी केशव शेगोकार, मुख्याध्यापक, सरपंच दिलीप तम्मडवार, पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. एकलव्य निवासी मॉडेल पब्लिक स्कूलच्या इमारतीचे बांधकाम 2016-17मध्ये सुरू करण्यात आले. इमारत बांधकामांतर्गत शाळा इमारत, मुला-मुलींचे वसतिगृह, भोजनगृह, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक निवासस्थान, खेळाचे मैदान, अभ्यगतांसाठी शौचालय, विद्युतघर, खेळाडूंसाठी मैदानावर चेजिंग रूम, वाहनतळ आदी सुविधांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. 15 एकर जमिनीवर 24 कोटी 16 लाख रुपये खर्चून इमारत संकुल बांधण्यात आले. या वेळी पुण्यातील विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळविलेल्या एकलव्यच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. आश्रमशाळा शिक्षक-कर्मचार्यांनी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी संकलित केलेल्या 21 हजार रुपयांच्या निधीचा धनादेश गोयल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
‘आयुष्यमान भारत’च्या लाभार्थ्यांशी मोदींचा संवाद
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढरकवडा येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन संवाद साधला. या वेळी पंतप्रधानांनी उपस्थित रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. तुम्हाला कोणता आजार आहे, डॉक्टरांनी उपचार कसे केले, आता तब्येत कशी आहे, ही योजना कशी सुरू आहे आदी प्रश्न पंतप्रधानांनी रुग्णांना विचारले. या वेळी पंतप्रधानांना माहिती देताना शंकर धामनकर म्हणाले, ही योजना नसती तर आमच्यावर उपचार झाले नसते. आजारावर पैसा खर्च करण्याची आमची ऐपत नव्हती. या योजनेमुळे आम्हाला लाभ झाला, असे त्यांनी सांगितले. या वेळी प्रसन्ना जांध या बालकाचे पालक पंतप्रधानांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्या तीन महिन्यांच्या बाळावर डॉक्टरांनी चांगले उपचार केले. आयुष्यमान भारत योजनेमुळे माझे बाळ आज सुखरूप आहे, अशी कृतज्ञताही पालकांनी व्यक्त केली. केंद्र शासनाची ही योजना
नसती तर आमच्यासारख्या गरीब रुग्णांना आजारावर उपचार घेता आले नसते, असे निलेश गलांडे यांनी सांगितले. मुख्य सभास्थळी आयोजित आयुष्यमान भारत कक्षामध्ये या योजनेचे एकूण 14 लाभार्थी उपस्थित होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारेही उपस्थित होत्या.