नागरिकांना नववर्षाची आरोग्यदायी भेट -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : प्रतिनिधी
महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असताना या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने हाती घेतली आहे. पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्यसेवेला आयुक्तांनी प्रथम प्राधान्य देऊन आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि.2) केले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने कळंबोली व कामोठे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आसुडगाव व तळोजा येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, एकनाथ गायकवाड, डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, पापा पटेल, माजी नगरसेविका सीता पाटील, कुसुम म्हात्रे, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, विद्या गायकवाड, भाजप नेते प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, शशिकांत शेळके, हर्षवर्धन पाटील, दामोदर चव्हाण, मुनाफ पटेल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे शहराध्यक्ष तेजस जाधव, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, नागरिक हे सर्व सोयीसुविधांचे केंद्रबिंदू आहेत. गेल्या वर्षीचे बजेट आपण आरोग्यसेवेसाठी राखीव ठेवले होते. त्यानुसार आपण 14 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच आरोग्यवर्धिनी उपकेंद्र सुरू केली आहेत. उर्वरित एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या पंधरा दिवसांत आपण सुरू करणार आहोत. यानंतरही आपण आरोग्यसेवेला प्राधान्य देऊन भविष्यात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढविणार आहोत. आपण आरोग्य केंद्रांचे उद्घाटन केले. त्यानंतर शाळांचे उद्घाटन करणार आहोत.