पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
मुंबई : प्रतिनिधी
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारले आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी इतके दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज अचानक प्रकट झाले. राज्याच्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप आहेत. त्यासंबंधीचे अनेक पुरावेदेखील समोर आले आहेत. तरीसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांना मूकसंमती आहे हे दिसून येते, असा आरोप आमदार शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला.
संजय राठोड यांनी आपल्याला या प्रकरणात गोवले जात असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी लावली आहे. त्यामुळे चौकशी पूर्णहोण्याआधीच बदनामी करणे थांबवावे, असे म्हटले. त्यावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची नेमकी कोणत्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे, अशी मागणी केली.
एका गंभीर प्रकरणातील आरोप असणारे अदृश्य मंत्री आज पंधरा दिवसांनंतर दृश्य झाले. त्यामुळे आतापर्यंत अदृश्य स्वरुपात असलेली कारवाई केव्हा दृश्य होणार? आता अदृश्य कारभार केव्हा दृश्य होणार?, अशी खोचक टीका आमदार शेलार यांनी केली.
मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर दडलंय काय?
पूजा चव्हाण प्रकरणात आतापर्यंत सरकार आपले बळ वापरून सारे काही दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. आज मंत्री संजय राठोड सर्वांसमोर आलेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही सर्व सूचना धुडकावून समर्थकांची गर्दी केली. परवानगी नसतानाही असा सार्वजनिक कार्यक्रम होतोच कसा? असे शक्तिप्रदर्शन करून पोलिसांवर दबाव आणण्याचा काम मंत्री करीत आहेत. एवढी गर्दी जमली त्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती की नाही? हे सांगावे. टोपीखाली दडलंय काय? असे म्हटले जाते, पण याची सूत्रे मंत्रालयातून चालवली जात आहे. त्यामुळे टोपीखाली नव्हे; तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील केबिनमध्ये दडलंय काय?, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
राठोड म्हणतात, तो मी नव्हेच!
पोहरागड (जि. वाशिम) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड मंगळवारी (दि. 23) अखेर सर्वांससमोर आले व मौन सोडले. या वेळी राठोड यांनी चव्हाण मृत्यू प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचे सांगत प्रसारमाध्यमांवरच खापर फोडले. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहावयास मिळाले.