Breaking News

जेएसडब्ल्यूकडून 170 मेट्रिक टन ऑक्सिजनपुरवठा

पेण : प्रतिनिधी

सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून मुंबई महानगर क्षेत्रासाठी 170 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नारायण बोलबंडा यांनी दिली.

ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी औद्योगिक कंपन्यांमध्ये तयार होणारा ऑक्सिजन आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडूनही मुंबई महानगर क्षेत्रासाठी दररोज 170 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. कंपनीत 100 आणि 70 मेट्रिक टन क्षमतेचे दोन ऑक्सिजन प्लान्ट कार्यरत आहेत. यामध्ये तयार होणारा सर्व ऑक्सिजन कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध करून दिला जात आहे, अशी माहिती बोलबंडा यांनी दिली.

 राज्यभरात ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता, नवीन 65 मेट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तर आणखी 115 मेट्रिक टन क्षमतेचा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव कंपनीने सादर केल्याचे बोलबंडा यांनी सांगितले.

कंपनीच्या माध्यमातून तीन दिवसांपासून 170 मेट्रिक टन ऑक्सिजन मुंबई, पुणे, रायगड विभागांत पुरवत आहोत. सध्या ऑक्सिजन मिळणे महत्त्वाचे असल्याने 300 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कर्नाटकच्या बेल्लरी प्लांटमधूनही दररोज ऑक्सिजन पुरवण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती नारायण बोलबंडा यांनी दिली आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply