रोहे : प्रतिनिधी
तालुक्यात खरीप हंगामाची तयारी पुर्ण होत असताना पाऊस मात्र खोळंबला आहे. रोहा तालुक्यात आतापर्यंत सुमारे 70 टक्के पेरण्या झाल्या असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. भात पिकासाठी रोहा तालुका ओळखला जातो.तालुक्यात या वर्षी 9850 हेक्टर क्षेत्रावर भातशेती अपेक्षित आहे. भात बियाणे, खतांची व्यवस्था सुरुळीत सुरू असून औषधेही उपलब्ध होणार आहेत. नव्याने विकसीत करण्यात आलेल्या लाल व काळा भात लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या वर्षी 100 शेतकर्यांना लाल व काळा बियाण्याचे वाटप करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी सांगितले. रोहा तालुक्यात दुसरे महत्त्वाचे पिक असलेल्या नाचणी पिकाची पेरणी पुर्ण झाली आहे. तालुक्यात 1090 हेक्टरवर नाचणी पिक घेण्यात येणार आहे. कृषी विभागाने शेतकर्यांना फुल नाचणीचे बियाणे या वर्षी पुरवले आहे. तालुक्यात 25 हेक्टरवर वरीची पेरणी पुर्ण झाली असून तूर 259 हेक्टरवर अपेक्षित आहे. तर या हंगामात 106 हेक्टरवर भाजीपाला अपेक्षित आहे. तालुक्यात 10 टन हळद लागवड अपेक्षित असून प्रायोगीक तत्वावर 50 शेतकर्यांना बियाणे वाटप करण्यात आले आहे. एक्सल कंपनीच्या विवेकानंद रिसर्च सेंटरच्या माध्यमातून सुशील रोळेकर यांच्या सहकार्याने बेंगळुर येथील कर्टुलीचे बियाणे 40 शेतकर्यांना वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे खरीप हंगामाची तयारी पुर्ण होत असताना पाऊस मात्र खोळंबला आहे. यावर्षी लवकर पाऊस येईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. मात्र आतापर्यंत रोहा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही.