लोकेश-गेलच्या खेळीने पंजाब विजयी
चेन्नई ः वृत्तसंस्था
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने पराभव केला. पंजाबचा या हंगामातील हा दुसरा विजय ठरला आहे.
कर्णधार केएल राहुल (नाबाद 60) आणि ख्रिस गेल (नाबाद 43) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मुंबईने दिलेले 132 धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले आणि या हंगामातील दुसर्या विजयाची नोंद केली. त्याआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 131 धावा केल्या होत्या.
पंजाबच्या डावाची सुरुवात राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावा केल्या. मयांक 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल आणि राहुलने विजायचे लक्ष्य सहजपणे पार केले. राहुलने 52 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 60 धावा केल्या, तर गेलने 35 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 43 धावा केल्या.
या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या गुणतक्यातील स्थानावर कोणताही फरक पडला नाही. ते चौथ्या स्थानावर कायम आहेत. पाच सामन्यांतील त्यांचा हा तिसरा पराभव आहे. पंजाबला मात्र या विजयाचा मोठा फायदा झाला आहे. त्यांनी सातव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली.त्याआधी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक हुड्डाने दुसर्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला 3 धावांवर माघारी पाठवले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशन 6 धावांवर बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. पहिल्या 10 षटकांत मुंबईला फक्त 48 धावाच करता आल्या.
धावसंख्या कमी असली तरी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसर्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीने संघाला 100च्या पुढे नेले. ही जोडी पुन्हा एकदा रवी बिश्नोईने फोडली. त्याने सूर्यकुमारला 33 धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक करणारा रोहित शर्मा 63 धावांवर माघारी परतला. त्याने 52 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. मधळ्या फळीतील हार्दिक पंड्या पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो 4 चेंडूंत एक धाव करून बाद झाला. अखेरच्या चार षटकांत मुंबईला फक्त 26 धावाच करता आल्या.