नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम (एनएमएमटी) अगोदरच तोट्यात असताना लॉकडाऊनमुळे महिन्याला पाच कोटींची झळ सोसावी लागत आहे, तर दिवसाला 30 लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस धावत असल्याने व प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न पूर्णपणे थांबल्याने परिवहनला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने आर्थिक समीकरणे जुळून येत नाहीत. परिणामी, उपक्रमाला तोटा सहन करावा लागत आहे. दरवर्षी महापालिकेच्या आर्थिक अनुदान निधीवर उपक्रमाला अवलंबून रहावे लागते. शहरातील अवैध प्रवासी वाहतूक, रिक्षा व बेस्ट बस यामुळे अनेक मार्गांवर एनएमएमटीला अपेक्षित असा प्रवासी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महिना पाच कोटींपर्यंतचा आर्थिक फटका परिवहनला बसत आहे. तो सहन करून उपक्रम चालवला जात असतानाच दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे एनएमएमटीची प्रवासी वाहतूक ठप्प आहे, तर केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी ठराविक मार्गांवर बस चालवल्या जात आहेत. लॉकडाऊनपूर्वी परिवहनला महिना साधारण 10 कोटी 51 लाख उत्पन्न मिळत होते, परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्रवासीवाहतूक काही महिने बंद असल्याने परिवहनच्या उत्पन्नाचे चाक लॉकडाऊनच्या गाळात रुतले आहे.
आणखी किती काळ बससेवा अल्प प्रमाणात राहील, याचेही चित्र स्पष्ट नाही. परिवहनच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने प्रवासी संख्या कशी वाढेल यावर सतत भर दिला जातो. त्यानंतरही ठरावीक मार्ग वगळता इतर मार्गावर एनएमएमटीची प्रवासी संख्या वाढू शकलेली नाही. लॉकडाऊनमुळे एनएमएमटीच्या तिजोरीला पडलेले भगदाड भरून काढण्यासाठी पुढील कित्येक महिने कसरत करावी लागणार आहे.
कोरोनापूर्वी परिवहन उपक्रमाला महिन्याला सरासरी 10 कोटी 51 लाख उत्पन्न होते, मात्र कोविड कालावधीदरम्यान महिन्याला पाच कोटी 58 लाख उत्पन्न परिवाहनच्या पदरी पडले. त्यामुळे महिन्याला जवळपास पाच कोटी तोटा परिवहनला सोसावा लागत आहे. मागील वर्षी कोरोना पूर्वी महिन्याला सहा कोटी 25 लाखांचा तोटा झाला होता.
कोरोना कालावधीमध्ये महिन्याला आठ कोटी 28 लाख प्रति महिना तोटा सहन करावा लागला होता. कोरोनापूर्वी दिवसाला 40 लाख नफा होता. आता दिवसाला 10 लाख परिवाहांच्या तिजोरीत पडत असून दिवसाला 30 लाख भुर्दंड सोसावा लागत आहे.
कोरोना काळात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आयटी क्षेत्रातील प्रवाशांत घट झाली. त्यातच डिझेलसह तत्सम घटकात वाढ झाल्याने परिवहनचे उत्पन्न सुमारे 50 टक्के कमी झाले, मात्र परिवहन सेवा एक सामाजिक उपक्रम आहे. नवी मुंबई मनपा प्रशासन ती चालवण्यासाठी सक्षम आहे. परिवहन सेवा गतिमान व उत्तम चालावी याकरिता पूर्वीपेक्षा अधिक अनुदान मनपाने दिले आहे.
-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम
RamPrahar – The Panvel Daily Paper