नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करीत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती एका आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही कायम आहे. रुग्णवाढीचा वेग, कोलमडण्याच्या मार्गावर असलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडकुंडीला आलेली रुग्णालये व रुग्णांचे होत असलेले मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची चौथ्या लाटेने झोप उडविली आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर केजरीवाल सरकारने लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली होती, मात्र रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानंतर रुग्णालयावर अतिरिक्त भार पडू लागला. त्यानंतर सरकारने तातडीने लॉकडाऊन लागू केला होता. दरम्यान, मागील एका आठवड्यापासून दिल्लीत कडक लॉकडाऊन लागू आहे. या काळातदेखील रुग्णसंख्येत कोणतीही घट झाली नाही. उलट ऑक्सिजन तुटवड्यामुळे आरोग्य व्यवस्था हतबल झाली. अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतलाय. केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. त्यानुसार आता पुढील सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाऊन असणार आहे.