Breaking News

राज्यात लॉकडाऊन वाढणार!

15 मेपर्यंत निर्बंध कायम राहण्याची शक्यता

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रात वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध म्हणत एकप्रकारे लॉकडाऊन लावला आहे. याआधी 1 मेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, पण राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तो आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत सर्वांचे एकमत झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याला दुजोरा दिला असून,
या संदर्भात अंतिम निर्णय शेवटच्या दिवशी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचा प्रकोप अजून थांबलेला नाही. दररोज 60 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद लॉकडाऊनच्या काळात मिळालेला नाही. काही जण सर्रासपणे कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करीत आहेत. दुसरीकडे ऑक्सिजन बेड, रेमेडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून, अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारायला नर्सिंग स्टाफही मिळेनासा झालाय. त्यामुळे 1 मेनंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय जवळजवळ निश्चित आहे, पण तो किती दिवस वाढवायचा याबाबत अंतिम निर्णय शेवटच्या दिवशी घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात 12 फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मागील 10 आठवड्यांत म्हणजेच अडीच महिन्यांत महाराष्ट्रातील तब्बल 23 लाखांच्या घरात नागरिकांना संसर्गाची बाधा झाली. गेल्या आठवड्यापासून राज्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांतील रुग्णसंख्या किंचित घटली आहे, तथापि नाशिक, नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा आलेख कायम चढता आहे. एकीकडे मुंबई, पुणे या शहरी भागातील रुग्णसंख्या घटली असली तरी ग्रामीण महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची चिन्हे आहेत.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply