Breaking News

वादाचे ‘मॉडेल’ ठरू पाहणारी लोहारे प्राथमिक शाळा

ग्रामस्थ, ग्रामपंचायत, कार्यकर्ते, सत्ताधारी, अधिकारी, सरकार व अपयशी ठरणार्‍या घोषणा व योजनांसंदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक उदाहरणांत पोलादपूर तालुक्यातील मॉडेल म्हणून निवड झालेल्या लोहारे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा समावेश होऊघातला आहे.

6 जुलै 2017 रोजी पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्येच्या लोहारे प्राथमिक शाळेत पाऊल टाकताच सकाळच्या प्रार्थनेसोबतचे ’मी सिद्ध मराया होऽ बलसागर भारत होवोऽ’ हे सुरू असलेले समूहगायन विद्यार्थ्यांची इमारतीच्या दुर्दशेमुळे निर्माण झालेली मानसिकताच जणू उघड करीत होते. पोलादपूर तालुक्यातील लोहारे शाळेच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत पाहणी करून सर्वप्रथम वृत्तांकन केले व यामुळे या शाळेच्या सद्यस्थितीबाबत स्थानिक माजी विद्यार्थी संघटना, रायगड जिल्हा परिषद व शासनाचे लक्ष वेधले गेले. यातून सर्वप्रथम स्थानिकांपैकी दानशूर असल्याने एका वर्गखोलीची इमारत पूर्णपणे भुईसपाट करून विटा, कौले, लाकडी सामान तसेच खिडक्या वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या. ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून डिजिटल शाळा केली असताना या डिजिटल शाळेसाठी घेतलेले संगणक व अन्य उपकरणेही गळक्या छपरामुळे ताडपत्रीत झाकून ठेवण्याची वेळ ओढवली होती. काही वर्गखोल्यांच्या छपरामध्ये विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा साज चढलेला दिसून येत होता.

माजी सभापती संभाजी साळुंखे यांनी या वेळी शाळेची मुख्य इमारत साधारणत: 60 ते 70 वर्षांपूर्वीची असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यानंतर काही वर्गखोल्या बांधण्यात आल्या, मात्र या वर्गखोल्यांची दुरवस्था झाली असून जुन्या इमारतीच्या एका वर्गखोलीची भिंत तब्बल अर्धा फूट भेग पडून वेगळी झाली. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वच्छतागृह असल्याने केव्हाही वर्गखोलीची भिंत कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता टाळण्यासाठी ग्रामसभेमध्ये निर्णय घेऊन ही वर्गखोली जेसीबीच्या साह्याने भुईसपाट करण्यात आली. याच इमारतीच्या दुसर्‍या बाजूच्या दोन खोल्यांची अवस्थाही धोकादायक असल्याने त्याचे छप्पर पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित करण्यासाठी छपरावर चढलेला कामगार छपरातून खाली कोसळून कंबर मोडली. त्याच्यावर उपचार करून ग्रामस्थांनी मदतही केली, अशी माहिती कथन केली होती. त्या वेळी तब्बल 12 वर्षे पाठपुरावा केला जात असल्याची माहिती देणार्‍या तत्कालीन मुख्याध्यापिका नवलकर यांची बदली झाली व मुख्याध्यापक दीक्षित यांनी सामंजस्याने कामकाज चालविण्याची भूमिका घेतली.

पोलादपूर तालुक्यातील एका ग्रामसेवकाने लोहारे ग्रामपंचायतीत बदली मागितली व अचानकपणे सद्यस्थितीत ग्रामसेवक असलेल्या सुधीर चव्हाण यांची बदली होण्यासाठी या सर्व प्रकरणात त्यांना गोवण्याचा प्रयत्न होऊ लागला. यानंतरच्या काळात आजपर्यंत माहितीचा अधिकार, तक्रार अर्ज, उपोषण, वृत्तवाहिन्यांमध्ये व वृत्तपत्रांतील बातम्या अशा प्रकारे मोहीम राबविण्यात आली. या तक्रारींची हीनता अगदी महिलांना सॅनिटरी पॅड्स देण्याच्या कृतीबाबतची तक्रार करण्याइतपतही घसरल्याने लोहारे ग्रामस्थांत संताप दिसताना अचानक राजकारणातील अध:पतनाचे द्योतक ठरलेले हे लोहारे प्राथमिक शाळा प्रकरण लोहारे ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणामध्ये वितुष्ट आणण्यापर्यंत पोहचले.

यानंतरच्या काळात लोहारे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पद्धतीची निवडणूक होऊन मागील दोन वेळेप्रमाणे तिसर्‍यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. लोहारे राजिप प्राथमिक शाळेच्या पुनर्बांधणीसाठी दानशूर म्हणून पुढे आलेल्यांनी कालांतराने आपल्या सासरच्या नातेवाइकांचा राजकीय संबंध तसेच माहितीचा अधिकार वापरून लोहारे ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केल्याने तत्कालीन सरपंच किसन पारकर, उपसरपंच शिवराम पवार, मीना निकम, निलेश साळुंखे, ललिता जाधव, सुरेश सुतार, वैशाली निकम, संजय सकपाळ व सुजाता साळुंखे यांनी सामूहिकरीत्या भेटून गेल्या काही महिन्यांपासून संबंधित दानशुराने महाड व पोलादपूर तालुक्यातील काही पत्रकारांना हाताशी घेऊन कथित भ्रष्टाचाराच्या बातम्यांद्वारे ग्रामपंचायत आणि लोहारे गाव बदनाम करून स्वतः केलेल्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदनामीसोबत दबावतंत्र अवलंबिले आहे, अशी माहिती देत सामूहिक राजीनामे देण्याची तयार दर्शविली. सरपंच पारकर तसेच शाळा समिती सभापती असलेले सदस्य निलेश संभाजी साळुंखे यांनी राजीनामेही दिले, मात्र याच दरम्यान सदस्यांतून सरपंच निवड करण्याचा शासन निर्णय झाल्याने अद्याप निवडणूक जाहीर होऊनही निलेश साळुंखे यांच्या रिक्त पदाची निवडणूक न झाल्याने सरपंचपदाचे प्रभारी कामकाज उपसरपंच शिवराम मारुती पवार यांच्याकडून पाहिले जात आहे. सद्यस्थितीत एका सदस्यासह सरपंचपदही रिक्त आहे. लोहारे प्राथमिक शाळेसाठी रायगड जिल्हा परिषदेकडून 10 लाखांचा निधी आल्यानंतर एम्पथी फाऊंडेशनकडून सदरचा निधी लोकवर्गणी म्हणून घेऊन सुमारे एक कोटीची इमारत बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असताना लोहारे हद्दीतील अन्य शाळांनीही एम्पथी फाऊंडेशनकडे इमारत बांधून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामुळे या सर्व घटनाक्रमांत कोणाच्या तरी सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणी तरी आडवे येत असावे

अशी परिस्थिती दिसून येऊ लागली आहे.

या सर्व घटनाक्रमांमध्ये प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणार्‍या दानशूर व्यक्तीने पोलादपूर पंचायत समितीने 16 मार्च 2020 रोजी उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रत्यक्षात उपोषण आमरण करण्याचा दबावतंत्राचा प्रयत्न करीत आभास निर्माण करून रात्र होताच उपोषण मागे घेतले. यानंतरही पत्रकार परिषदा घेणे, गावातील हॉटेल व्यावसायिकांविरोधात दबावतंत्र निर्माण करणे, 14व्या वित्त आयोगातील विकासकामांबाबत तक्रारी करणे, महिलांच्या आरोग्याबाबत तक्रारी करणे असे प्रकार सुरू ठेवून दानशूर व्यक्तीने ग्रामस्थांसह महिलावर्ग तसेच प्रशासनाला वेठीस धरले आहे. लोकशाही फक्त या दानशूर व्यक्तीसाठीच असल्याच्या आविर्भावात काही लोक पाठिंबा देत आहेत. या वर्षी या प्रकरणाला विश्रांती मिळेल असे वाटत असतानाच 7 मार्च 2021 रोजी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महाआघाडी सरकारने राज्यातील 500 शाळांना मॉडेल शाळा करण्यास मंजुरी दिली असून यामध्ये रायगड जिल्ह्यात 15 शाळा, तर पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची लोहारे प्राथमिक शाळेची मॉडेल शाळा होण्यासाठी निवड झाल्याचे जाहीर केले, मात्र या कार्यक्रमात तालुक्यातील सर्वांत वादग्रस्त ठरलेल्या लोहारे राजिप प्राथमिक शाळेला अचानक मॉडेल शाळा घोषित करण्याच्या घटनेनंतर संपूर्ण तालुका अचंबित झाला आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply