Breaking News

कर्नाळा परिसरात वेगाला बसणार ‘ब्रेक’

आरटीओच्या सेफ्टी व्हेईकलची नजर; विशेष उपाययोजना सुरू

पनवेल ः वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलनजिक असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरातून भरधाव वेगात जाणार्‍या वाहनांना आता ब्रेक लागणार आहे. कारण या वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी आरटीओची नजर असणार आहे. वार्‍याच्या वेगाने धावणार्‍या वाहनांवर आता रोड सेफ्टी व्हेईकलच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी आरटीओने विशेष उपाययोजना सुरू केलेली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने कर्नाळा परिसराचे रूपडे पालटले आहे. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. दररोज या परिसरात रायगड, ठाणे, मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो पर्यटक येत असतात. सध्या महामार्ग झाल्याने या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक सुसाट धावतात. अनेकदा या सुसाट वेगाने अपघात घडून निष्पाप जीवही गेलेले आहे. शिवाय या परिसरातील पशु, पक्षी, विशेष करून माकडे, वानरे या सुसाट वेगाला बळी पडलेली आहेत. यामुळेच आरटीओने आता या महामार्गावरील सुसाट वाहनांना आवर घालण्यासाठी पाऊले उचलली आहेत. यासाठी परिवहन विभागाने आरटीओसाठी रोड सेफ्टी व्हेईकल उपलब्ध करून दिलेली आहे.

या वाहनांच्या माध्यमातून सुसाट धावणार्‍या वाहनांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. वाहनांना वेगमर्यादा घालून देणारी अधिसूचना वाहतूक पोलीस विभागाने जारी केली आहे. रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाट रस्ते, वळण रस्ते, समतल रस्ते, चढउतार आदी बाबींचा विचार करून महत्तम वेग मर्यादा निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

वेगमर्यादा न पाळणार्‍या वाहनांवर कारवाई

महामार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनांना ठरवून दिलेल्या नियंत्रित वेगमर्यादा वाहनांनी ओलांडल्या तर तपासासाठी फिरत असलेल्या रोड सेफ्टी व्हेईकलमधील अधिकारी त्या त्या वाहनांचे फोटो काढून वाहनाच्या नोंदणी क्रमांकावर चलान पाठवून देतात. नियंत्रित वेगमर्यादा ओलांडणार्‍या वाहनांना दोन हजार रूपयांचे चलान आकारले जाते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply