अमरावती ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा उपलब्ध करून दिल्यामुळेच महाराष्ट्रात व्यापक लसीकरण करता आले, असा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 29) अमरावतीच्या दौर्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना केला आहे. देशात सर्वांत जास्त लसीकरण महाराष्ट्राने केले आहे, या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या विधानाची आठवणही फडणवीस यांनी या वेळी करून दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अमरावतीच्या दौर्यावर आले आहेत. या वेळी त्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोविड रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी अमरावती जिल्ह्याच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावर आपली ठाम भूमिका मांडली.
कोरोना प्रतिबंधात्मक लस ही आपण तयार केली म्हणून ठीक आहे, पण जर परदेशातून मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती, मात्र केंद्राने सर्वाधिक लसींचा पुरवठा केल्यामुळे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुण्यातील सीरम संस्था मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस तयार करीत आहे, पण लस बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल हा अमेरिकेतून येत होता, पण तो अचानक बंद झाला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आता अमेरिका कच्चा माल पाठवत आहे. त्यामुळे लवकरच लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, असा आशावाददेखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करावे लागेल, असा मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय योग्य ठरणार नाही. लसीकरण करताना लसींचा किती पुरवठा होत आहे याचा विचार करून नियोजन करावे लागते. एका दिवसात सर्व लसी तयार होत नाहीत, असे खडे बोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सरकारला सुनावले.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …