Breaking News

केंद्र सरकारचे ‘मिशन रेमडेसिवीर’

अनेक देशांशी संपर्क

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीची पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राने इजिप्त, उज्बेकिस्तान, यूएई आणि बांगलादेशकडून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, या देशांशी संपर्कही सुरू केला आहे.
अमेरिकेची फार्मा कंपनी गिलीएड सायन्सने भारताला 4.50 लाख इंजेक्शन देण्यास होकार दिला आहे, तसेच भारतात रेमडेसिवीरचे उत्पादन वाढावे म्हणून कच्चा माल देण्याचाही निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता केंद्राने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्राने रेमडेसिवीरचे प्रतिमाह उत्पादन 78 लाख वायलपर्यंत वाढविण्याचे आधीच सांगितले होते. रेमडेसिवीरच्या सात मॅन्युफॅक्चर्सची सध्याची उत्पादन क्षमता 38.80 लाख वायल प्रतिमाह असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.
भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता चीननेही भारताला मदतीचा प्रस्ताव दिला आहे, मात्र भारताने अद्याप त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पाकिस्ताननेही भारताला मदतीचा हात पुढे केला असून भारताने त्यावरही प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बेल्झियम, रोमानिया, लक्समबर्ग, सिंगापूर, पोर्तुगाल, स्विडन, न्यूझीलंड, कुवेत व मॉरिशससह अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला. सिंगापूरने भारताला 256 ऑक्सिजन सिलिंडर्स दिले आहेत. नॉर्वे सरकारनेही भारताला वैद्यकीय सेवेसाठी 24 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत देणार असल्याची घोषणा केली. तसेच स्वित्झर्लंडही भारताला ऑक्सिजन कन्सट्रेटर, व्हेंटिलेटर व अन्य वैद्यकीय उपकरणे देत आहे.
अमेरिकेची मदत
शुक्रवारी अमेरिकेडून ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कन्स्ट्रटेरसह इतर औषधांची पहिली खेप येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका एस्ट्राजेनेकाचे एक कोटी डोस भारताला देणार आहे. त्याशिवाय पाच कोटी डोसचे उत्पादन विविध टप्प्यांत आहे. भारताने अमेरिकेकडे वॅक्सिनच्या तयार डोससह कोविड वॅक्सिनच्या उत्पादनासाठी कच्च्या मालाची मागणीही केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply