मुंबई ः प्रतिनिधी
कोरोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कोरोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. 250 उद्योजक तरुणांनी सुरू केलेल्या मिशन ऑक्सिजनसाठी सचिनने तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे.
मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत करीत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली. मी खेळत असताना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता. त्यामुळे मी यश मिळवू शकलो. आज आपण कोरोनाविरोधात लढणार्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे, अशा आशयाचा संदेश त्याने दिला आहे.
यापूर्वी गेल्या वर्षीही सचिनने अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता.
राजस्थान, दिल्ली संघांकडूनही सहाय्य
कोरोनावर मात करण्यासाठी आता क्रिकेटपटूंप्रमाणेच आयपीएलमधील फ्रँचायझी पुढे आल्या आहेत. राजस्थान रॉयल्स संघातील मॅनेजर, खेळाडू आणि फ्रँचायझी यांनी मिळून 7.5 कोटी रुपयांची मदत केली आहे, तर दिल्ली कॅपिटल्स संघानेही कोरोनाच्या महासंकटात दीड कोटी रुपये मदत म्हणून दिले आहेत. ऑक्सिजन आणि कोविड कीट खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने खारीचा वाटा उचलला आहे. ट्विट करून दोन्ही संघांनी ही माहिती दिली.