Breaking News

कर्नाळा बँक ठेवीदार अजूनही संभ्रमात

केलेल्या अर्जाची पोचपावती नाही ;अवसायकाच्या बदलीमुळेही साशंकता

नवेल : प्रतिनिधी
कर्नाळा बँकेतील जमा ठेवींवर विम्यामुळे मिळणार्‍या पाच लाख रुपयांपर्यंतच्या परताव्यासाठी ठेवीदारांनी केलेल्या अर्जावर बँकेमार्फत कोणतीही पोच बँकेचे कर्मचारी देत नसल्याने बँकेच्याच ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच सहकार खात्याने नेमलेले अवसायक जी. जी. मावळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने ठेवीदारांच्या गोंधळात आणखी भर पडली आहे.
डी.आय.सी.जी.सी.च्या नियमाप्रमाणे ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या विम्याची रक्कम परत मिळणार आहे. सोमवार (दि. 23) पासून बँकेच्या मुख्य शाखेत त्यासाठी ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली, मात्र ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारल्यावर त्यांना अर्ज स्वीकारल्याची कोणतीही पोचपावती दिली जात नाही. त्यामुळे ठेवीदार आणि बँकेचे कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होत आहेत.
ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारल्याची पावती किंवा अर्जाच्या झेरॉक्सवर सही करून व शिक्का मारून दिला जात नाही. त्यामुळे अर्जाची पोच न देण्यामागेही काही षडयंत्र आहे की काय, असा संभ्रम ठेवीदारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच अवसायक मावळे यांची बदली झाल्याने ठेवीदारांनाही शंका वाटत आहे.
ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारल्यावर बँकेचे कर्मचारी त्यावर क्रमांकही टाकत नाहीत. त्यामुळे एखादा अर्ज गहाळ झाल्यास त्याचा पुरावाही ठेवीदारांकडे राहणार नाही आणि अर्ज देऊनही त्या ठेवीदारास ‘अर्ज दिला नाही’ या सबबीखाली पैसे मिळणार नाहीत. याबाबत बँक कर्मचार्‍यांना विचारल्यावर बँक कर्मचारी म्हणतात, ‘आम्हाला ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही अर्ज स्वीकारत आहोत’.
कर्नाळा बँक ही अशा गलथान कारभारामुळेच बुडित निघाली. त्यात शेकापक्षाच्या नेत्यांनी डी.आय.सी.जी.सी.च्या नियमाप्रमाणे ठेवीदारांना पैसे परत मिळावेत यासाठी त्यांच्याकडे (‘शेकाप’कडे) अर्ज जमा करण्याचा मेसेज पाठवला होता. शेकापच्या या मेसेजला तत्कालीन प्रशासकांनी विरोध केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अर्जाची पोच न देण्यामागेही षडयंत्र आहे का, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे.

कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीकडे कर्नाळा बँकेसंदर्भात खातेदार आणि ठेवीदारांनी विविध तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या तक्रारी आणि समस्यांसंदर्भात आम्ही समितीतर्फे नवे अवसायक बालाजी वाघमारे यांची येत्या सोमवारी भेट घेणार आहोत.
आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती

आज सकाळी मी कर्नाळा बँकेच्या मुख्य शाखेत अर्ज देण्यास जाताना त्याची झेरॉक्स पोच घेण्यासाठी सोबत घेऊन गेलो होतो. त्यांनी काऊंटरवर माझी कागदपत्रे तपासून अर्ज घेतला. मी पोच मागितली असता ती देण्यास त्यांनी नकार दिला. त्याबाबत माझा त्यांच्याशी वाद झाला, पण त्यांनी आम्ही पोच देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे बँकेकडूनच जर माझा अर्ज हरवला तर मला पैसे कसे मिळणार हा प्रश्न मला पडला आहे.
दिनकर देशमुख, नवीन पनवेल

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply