Breaking News

पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यात जातोय ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा साठा

देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

वसई ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करताना योग्य नियोजन केले आहे, मात्र महाराष्ट्रात जिथे पॉवरफुल मंत्री आहे त्यांच्याच जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा साठा चालला आहे, असा आरोप राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पालघर येथे कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील उसगाव डोंगरी येथील श्रमजीवी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि. 1) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार मनीषा चौधरी, माजी आमदार विवेक पंडित आदी उपस्थित होते.    
आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने सर्वात जास्त ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा 40 हजारांचा कोटा वाढवून जवळपास चार लाख 75 हजार रेमेडेसिवीर महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन व इतर सामग्रीचे वाटप करताना नियोजन केले आहे, मात्र, महाराष्ट्रात तसे होताना दिसत नाहीये. जिथे पॉवरफुल मंत्री आहे तिथे ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा जास्त साठा जातोय. हे वाटप योग्य प्रमाणात झाले पाहिजे. मंत्री हे राज्याचे असतात. त्यांनी सगळे आमच्या जिल्ह्यात यावे अशी मानसिकता न ठेवता जे कमी आहेत ते सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे हा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
रुग्ण वाढत असल्याने आरोग्यव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. 70 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे केले जाऊ शकते, मात्र कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व जण लगेच रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे, जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.
राज्यातील परिस्थिती चिंताजनक
कोविडच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण पाहायला मिळत आहेत. मागच्या लाटेच्या तुलनेत अधिक प्रसार पाहायला मिळतोय. महाराष्ट्र हे कोरोना संसर्गाचे केंद्र बनले आहे. सर्वाधिक रुग्ण, मृत्यू आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आपल्या राज्यात आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती आहे. पूर्वी परिवारातील एखादा व्यक्ती कोरोनाग्रस्त व्हायचा, मात्र आता संपूर्ण परिवाराला कोरोनाची लागण होताना दिसत आहे, तसेच या वेळच्या संसर्गात सर्व प्रकारच्या स्तरातील लोकांना लागण होताना दिसतेय, असे फडणवीस या वेळी म्हणाले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply