Breaking News

नवीन पनवेलमधील भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार

पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधून जुन्या पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे  हा मार्ग पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत आहे. या  भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15ए, पोदी नं. 1 व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदीजवळील रेल्वे गेट ओलांडून किंवा एचडीएफसी सर्कलच्या पुलावरून जावे लागते. या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. कारण माथेरान रस्त्याकडून व डी मार्ट भागातून येणारी वाहतूक ही या पुलावरूनच होत असते. या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले. नागरी वस्ती वाढल्याने वाहतूक वाढली त्याचा परिणाम रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे आज पोदीजवळ असलेल्या  रेल्वे गेटचा वापर नागरिक व विद्यार्थी  धोकादायक पद्धतीने करीत आहेत.

त्यामुळे या भागात भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. या भुयारी  मार्गासाठी 10 करोडपेक्षा जास्त खर्चाला मंजुरी मिळाली होती. ठेकेदाराच्या टेंडरमधील कालावधीप्रमाणे मे 2018 मध्ये काम पूर्ण होणे गरजेचे होते, पण  डिसेंबर 2017 पासून काम बंद पडले होते. याबाबत नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिली असता आमदारांनी सदर काम सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली होती.

या भुयारी मार्गासाठी सिमेंट ब्लॉक तयार करण्यात येऊन हे सिमेंट ब्लॉक एका पाठोपाठ एक रेल्वे लाईन खाली टाकण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉक टाकताना रेल्वे लाईन खालील माती थोडी-थोडी काढून ते आत सरकवण्यात आले. त्या वेळी त्या लाईनवरील गाड्या दुसर्‍या लाईनवरून वळवण्यात आल्या होत्या. आता शेवटचा ब्लॉक आत टाकायचा राहिला असून आठवडाभरात ते काम पूर्ण होईल. दोन्ही बाजूचा रस्ता मे अखेरपर्यंत पूर्ण झाल्यावर हा भुयारी मार्ग सुरू होईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिल्याचे तेजस कांडपिळे यांनी सांगितले. यामुळे नवीन पनवेलमधील पोदी, विचुंबे आणि उसर्ली येथील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे.

पनवेल महानगरपालिका झाल्याने व भविष्यातील नैना प्रोजेक्टमुळे येथील वस्ती वाढणार आहे. वाहतुकीची समस्या जटील होईल. राष्ट्रीय महामार्गावरून पुणे व कोकणात नवीन पनवेल, विचुंबा व उसर्ली या भागातून जाणार्‍यांना भुयारी मार्ग जवळचा आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचेल रेल्वे गेट ओलांडताना अपघात होण्याचा धोका राहणार नाही. याबाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष दिल्यामुळेच हे काम लवकर पूर्ण होत आहे.

-तेजस कांडपिळे, नगरसेवक

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply