पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका याठिकाणी व्यवसाय करणार्या विविध व्यवसायिकांसह घोडेमालकांनाही बसला आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून पनवेल परिसरातील ट्रॅकर्सने एकत्र येऊन जवळपास 66 हजार 600 रूपये घोड्यांच्या दाणापाण्यासाठी दिले आहेत.
खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक तिदार, इंदलकर, जगदाळे, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक राजू गुप्ते, अॅड. संतोष लाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडे आदींसह अनेक जण एकत्र येऊन दर रविवारी ट्रॅकिंग करण्यासाठी पनवेल परिसरातील गड किल्ल्यांवर व डोंगरमाथ्यांवर जात असतात. त्यात प्रामुख्याने माथेरानला जातात. सध्याच्या काळात माथेरान येथे घोडेस्वारीचा व्यवसाय करणार्या घोडे मालकांना ग्राहक मिळणे कठिण झाले आहे. आपले कुटूंब सांभाळायचे त्याचप्रमाणे घोड्यांचा दाणापाणी, त्यांची औषधे, निगराणी आदींमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना खर्च होत असतो. कित्येक जण पारंपारिक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय करीत आहेत.
या संदर्भातील त्यांच्या व्यथा वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यापर्यंत पोहचल्या व त्यांनी आपल्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून रोखरक्कम जमा करून ती आज डिव्हायएसपी खेरडीकर व माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत घोडे मालकांकडे सुपूर्द केली. या ग्रुपने या पूर्वीही अनेकांना मदत केली आहे. तसेच दोन वेळा स्वच्छता मोहिमही राबविली आहे.