नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या वादळी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने शनिवारी (दि.1) झालेल्या आयपीएलच्या साखळी सामन्यात मोठे आव्हान पार करीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 218 धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईने हे महाकाय आव्हान पोलार्डच्या तडोखबंद फलंदाजीमुळे शेवटच्या चेंडूवर रोमहर्षकरित्या पार केले. पोलार्डलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने बिनबाद 58 धावा केल्या. पॉवरप्लेनंतर चेन्नईचा मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरने रोहित शर्माला झेलबाद करीत मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. रोहितने 35 धावा केल्या. रोहित-क्विंटनने पहिल्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी रचली. रोहितनंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादव स्वस्तात (3 धावा) बाद झाला. यानंतर मोईन अलीने स्थिरावलेल्या डी कॉकचा स्वत: च्याच गोलंदाजीवर झेल टिपला. डी कॉकने 38 धावांचे योगदान दिले. 10 षटकात मुंबईने 3 बाद 81 धावा फलकावर लावल्या होत्या. यानंतर कायरन पोलार्ड मैदानात आला. त्याने कोणताही दबाव न घेता कृणाल पांड्यासोबत भागीदारी रचली. पोलार्डने 15व्या षटकात शार्दुल ठाकूरला चौकार ठोकत 17 चेंडूंत अर्धशतक साकारले. यंदाच्या आयपीएलमधील हे वेगवान अर्धशतक ठरले. सॅम करनने पांड्याला पायचित पकडत ही भागीदारी मोडली. पांड्याने 32 धावा केल्या. कृणालनंतर हार्दिक मैदानात आला. दोन षटकात मुंबईला विजयासाठी 31 धावांची गरज असताना त्याने दोन षटकार ठोकले, पण तो बाद झाला. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या लुंगी एनगिडीवर हल्ला चढवत आव्हान पूर्ण केले. पोलार्डने आपल्या 87 धावांच्या नाबाद खेळीत सहा चौकार आणि आठ षटकार ठोकले. तत्पूर्वी, नाणेफेक हरलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना फाफ डु प्लेसिस, मोईन अली आणि अंबाती रायुडू यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे 20 षटकांत चार बाद 218 धावा फलकावर लावल्या होत्या. आयपीएलमध्ये चेन्नईच्या मुंबईसमोर या सर्वाधिक धावा ठरल्या. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या पहिल्याच षटकात ऋतुराज माघारी परतला. मागील काही सामन्यात ऋतुराजने जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले होते, मात्र या वेळी त्याला फक्त 4 धावांचे योगदान देता आले. ऋतुराज स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने मोर्चा सांभाळला. त्याने सलामीवीर फाफ डु प्लेसिससोबत भागीदारी रचली. यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्मात असलेल्या अलीने 33 चेंडूंत अर्धशतक साकारले. अखेर बुमराहने अलीला माघारी धाडले. अलीने पाच चौकार आणि पाच षटकारांसह 58 धावा केल्या. अली बाद झाल्यानंतर डु प्लेसिसने 27 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकानंतर तो पोलार्डच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने चार चौकार आणि दोन षटकारांसह 50 धावांची खेळी केली. डु प्लेसिसनंतर सुरेश रैनाही माघारी परतला. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. पोलार्डने मुंबईसाठी टाकलेल्या 12व्या षटकात दोन बळी घेत चेन्नईला संकटात टाकले. यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचली. जडेजाने संयमी, तर रायुडूने आक्रमक पवित्रा धारण करत मुंबईच्या वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या 20 चेंडूंत अर्धशतक साकारले. यंदाच्या हंगामातील हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. रायुडूने 27 चेंडूंत सात षटकार आणि चार चौकारांसह नाबाद 72 धावांची खेळी केली, तर जडेजा 22 धावांवर नाबाद राहिला. कायरन पोलार्ड : 87*, धावा 34 चेंडू, 6 चौकार, 8 षटकार