नवी दिल्ली ः देशात चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश अशा पाच ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसामसह पुद्दुचेरीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये अनुक्रमे तृणमूल काँग्रेस आणि डावी लोकशाही आघाडीने (एलडीएफ) सत्ता राखली, तर तामिळनाडूत द्रमुकने बहुमत प्राप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. भाजपने आसाममध्ये सलग दुसर्यांदा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या आसाममध्ये तळ ठोकून होते, मात्र त्याचा विशेष फायदा काँग्रेसला झाला नाही, तर पुद्दुचेरीत भाजपला परिवर्तन घडवण्यात यश आले आहे. पुद्दुचेरीत काँग्रेसची सत्ता होती. या ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता राखली. या ठिकाणी सत्ता परिवर्तन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले असले तरी 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बंगालमध्ये अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत भाजपने 75हून अधिक जागांवर मारलेली मुसंडी ही भाजपसाठी हनुमान उडी ठरली आहे. निवडणुकीचे अचूक नियोजन, टीमवर्क आणि जनमताची नाडी ओळखून केलेला प्रचार या बळावर भाजपला एवढे मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमत दिले आहे. डावी लोकशाही आघाडीने तेथे विजयी आघाडी घेतली, तर संयुक्त लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात लढत बघायला मिळाली. सुरुवातीला दोन्ही आघाड्यांमध्ये अटीतटीची लढत सुरू झाली, मात्र नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूतील जनतेने द्रमुकला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …