प्रकल्पग्रस्त संघटनांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन
उलवे नोड : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मंजूर केला गेला असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांनी सिडकोच्या कृतीचा जाहीर निषेध करीत राज्य सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा, अशा आशयाचे निवेदन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना रविवारी (दि. 2) दिले.
अखिल आगरी समाज परिषद, एमआयडीसी, सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती व विविध संघटनांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, सरचिटणीस दीपक म्हात्रे तसेच एमआयडीसी, सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता, लोकप्रतिनिधी गेली अनेक वर्षे करीत असून, त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. असे असता अचानकपणे सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल येथील जनतेच्या मनात नितांत आदर आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्वही उत्तुंग आहे, पण ज्यांनी नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांसाठी आपले संबंध आयुष्य खर्ची घातले, शौर्यशाली व गौरवशाली असा प्रचंड लढा देऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला त्या भूमिपुत्राचेच नाव या विमानतळाला देणे संयुक्तिक ठरेल. सिडकोच्या या नोकरशहांनी राजकीय दडपणाखाली हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिडकोविरुद्ध येथील जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सिडकोच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेधकरीत आहोत. सरकारने यांचा गंभीरपणे विचार करावा. दरम्यान, या संदर्भात जासई येथे ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी (दि. 3) सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रकल्पग्रस्त संघटनांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.