उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
येथील पंचायत समितीचे शेकापचे सभापती अॅड. सागर कडू यांनी नऊ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची जेलमध्ये रवानगी झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सभापती अॅड. सागर कडू यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कडू यांनी अनेकांना जागा देतो असे सांगून फसवले. त्यांनी कोणत्याही प्रकारचा जागेचा नोंदणी दस्त करून दिला नाही आणि जागेचा ताबाही दिला नाही. आतापर्यंत त्यांनी नऊ जणांची 52 लाख 45 हजार रुपयांना फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भा.दं.वि. कलम 420प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. कडू हे 28 एप्रिल रोजी उरण पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली व अधिक तपास करून 30 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे कडू यांची तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.