कर्जत : बातमीदार
माथेरान नगर परिषदेने आकाशगंगा हा अवकाश निरीक्षण प्रकल्प उभारला आहे. काही खगोलप्रेमी या केंद्रावर येऊन अवकाश दर्शन करायचे. मात्र कोटीच्या घरात खर्च करून उभारलेला हा प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. आकाशगंगा निरीक्षण केंद्रात आल्यानंतर पर्यटकांना सुरुवातीला ग्रह आणि तार्यांविषयी माहिती दिली जाते. त्यानंतर 35 आसनी थिएटरमध्ये तारे, ग्रह विषयक अर्ध्या तासाचा लघुपट दाखविला जातो आणि सायंकाळी 7.30 नंतर अत्याधुनिक दुर्बिणीतून आकाश भ्रमंती केली जाते. नगर परिषदेने हा प्रकल्प देखभालीसाठी मुंबईच्या युनायटेड सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीला दिला आहे. या कंपनीच्या माध्यमातून या केंद्रात अध्ययावत सामुग्री बसविण्यात आली आहे. या केंद्रातील दुर्बीण मुंबई येथून संगणक तंत्रज्ञान वापरून नियंत्रित केली जाते. माथेरानमधील सर्वात उंच ठिकाणी हे केंद्र असल्याने कोणत्याही वेळी येथून ग्रह-तारे यांचे निरीक्षण करता येते. प्रसिद्ध पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सात सुशिक्षितांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मात्र अनेक महिने हे केंद्र बंद असल्याने दुर्बिणीसह सर्व साहित्य, यंत्रसामुग्री नादुरुस्त झाली आहे. इमारतीची नळजोडणी बंद पडली आहे. त्यामुळे तेथील शौचालाय परिसर दुर्गंधीने भरून राहिले आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेली ‘आकाशगंगा‘ पुन्हा सुरू व्हावे, अशी मागणी आहे. या अवकाश केंद्राची दुरुस्ती करण्याची मागणी माथेरानकर करू लागले आहेत. मात्र पालिका प्रशासनला अद्याप आकाशगंगा प्रकल्पाकडे पाहायला वेळ नाही. ही बाब खगोलप्रेमी यांच्यासाठी खेदजनक असल्याचे बोलले जात आहे.