पाली ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय पास्को कंपनीतील भंगाराचा वाद उफाळून आला आहे. यावरून रविवारी (दि. 2) रोहा तालुक्यातील सुतारवाडीत हाणामारी होऊन अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोस्को कंपनीतून निघणारे भंगार कोण घेणार यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे. यातून दोन-चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर येऊन एकमेकांना भिडले होते. यापूर्वी दोन ट्रक जाळले गेले आहेत, तर शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना मारहाणही झाली होती. हा वाद विकोपाला पोहचला असून, रविवारी दुपारी विळे-कोलाड रस्त्यावर सुतारवाडी गाव परिसरात तुफान हाणामारी झाली. यामध्ये पाच ट्रकसह 25 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाच्या कारचाही समावेश आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या गाड्या जमावाने फोडल्या, दगडफेक केली. आम्ही बाहेर पडलो म्हणून वाचलो, असे या वेळी संबंधित ट्रकचालकांनी सांगितले. दरम्यान, भविष्यात हे प्रकरण कसे वळण घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.